नवी दिल्लीः भारताची मॅरेथॉन रनर ओपी जैशाने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने दोन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आहे. जैशाने रिओ ऑलिम्पिकमध्ये सोबत असलेल्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप केला आहे.
जैशाच्या आरोपानंतर केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी आरोपांची चौकशी करण्यासाठी द्विसदस्यीय समिती नियुक्त केली आहे, अशी माहिती क्रिडा मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या सूचनेत दिली आहे. या समितीमध्ये क्रीडा मंत्रालयाचे सहसचिव ओंकार केडिया आणि संचालक विवेक नारायण यांचा समावेश आहे.
जैशाला रिओ ऑलिम्पिकच्या महिला मॅरेथॉन स्पर्धेत 89 व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. धावल्यानंतर ती फिनिशिंग लाईनवर पोहचताच बेशुद्ध झाली होती. रस्त्यात पाणी किंवा एनर्जी ड्रिंक देण्यासाठी कोणीही भारतीय अधिकारी उपस्थित नव्हता. एवढंच नव्हे तर रुग्णालयात नेण्यासाठी देखील कोणी उपस्थित नव्हतं, असा आरोप जैशाने केला आहे.
दरम्यान, जैशाचे हे सर्व आरोप भारतीय अॅथलेटीक्स महासंघाने फेटाळून लावले आहेत. जैशाला स्पर्धेच्या अगोदर एनर्जी ड्रिंकच्या पर्यायाविषयी विचारणा केली होती, मात्र तिने नकार दिला, असं महासंघाने सांगितलं आहे. समिती 7 दिवसांच्या आत चौकशी अहवाल सादर करणार आहे.