मुंबई : भाजप आमदार आशिष शेलार आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर आम आदमी पक्षाने आपला मोर्चा आता राज्याच्या शिक्षण क्षेत्राकडे वळवला आहे. भाजपचे सांगलीचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी सांगलीतील वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगची सुमारे 110 एकर जमीन बळकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप 'आप'ने केला आहे.

 

'आप' नेत्या प्रीती मेनन यांनी मुंबईत या संदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रीती मेनन म्हणाल्या की, "बळाचा वापर करुन पृथ्वीराज देशमुख वालचंद कॉलेजचा कारभार हाती घेण्याचा प्रयत्न करत आहे. 24 मे 2016 रोजी देशमुख यांनी पुण्यात वालचंद कॉलेजच्या कार्यालयावर हल्ला केला होता. या प्रकरणी पृथ्वीराज देशमुख यांच्यावर कारवाई होऊन ते जेलमध्ये असायला हवे होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादामुळेच पृथ्वीराज देशमुख सध्या मोकाट फिरत आहेत."

 

तसंच या प्रकरणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यालयातूनही पृथ्वीराज देशमुख यांना मदत मिळत असल्याचा दावा प्रीती मेनन यांनी केला आहे.