PKL 2023 Auction : प्रो कबड्डी लीग 2023 (Pro Kabaddi League 2023) च्या हंगामात भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार पवन सहरावत सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तेलगू टायटन्स संघाने पवन सहरावतला कोट्यवधी रुपयांची बोली लावत आपल्या संघाचा भाग बनवलं आहे. यासोबतच पवन सहरा प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मुंबईमध्ये 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी प्रो कबड्डी लीगचा लिलाव पार पडत आहे. 9 ऑक्टोबर रोजी तेलगू टायटन्सने पवन सहरावतसाठी 2 कोटी रुपयांहून अधिक किंमतीची बोली लावून खरेदी केलं.


प्रो कबड्डी लीगमधील सर्वात महागडा खेळाडू


पवन सहरावतच्या नेतृत्वाखाली, भारताने नुकतेच आशियाई स्पर्धा 2023 मध्ये पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. प्रो कबड्डी लीगमधील हैदराबादचा संघ तेलुगू टायटन्सने पवन सहरावतला 2.61 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. ही प्रो कबड्डी लीग 2023 च्या इतिहासातील सर्वाधिक बोली आहे. पवनच्या आधी प्रो कबड्डीच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूचा विक्रम इराणचा बचावपटू मोहम्मदरेझा शादलूच्या नावावर होता.








पवनसाठी पीकेएच्या इतिहासातील सर्वाधिक बोली


भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार पवन सेहरावत 'हाय-फ्लायर' म्हणून ओळखला जातो. पीकेएलच्या लिलावात त्याच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सर्व संघ त्याच्यावर बोली लावण्यासाठी उत्सुक होते. पवनसाठी सुरुवातीला यूपी योद्धाच्या संघाने 20 लाख रुपयांची बोली लावली. यानंतर बेंगळुरू बुल्सने ही रक्कम थेट 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवली. यानंतर तेलुगू टायटन्सने उडी घेतली आणि पवनसाठी 1.50 कोटी रुपयांची बोली लावली. त्यानंतर, त्यांना हरियाणा स्टीलर्सकडून 2.50 कोटी रुपयांची बोली लागली. यानंतर तेलुगू टायटन्सने पवनसाठी 2.61 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावत त्याला आपल्या संघात सामील केलं.






शाडलू पुणेरी पलटण संघात सामील


पीकेएलच्या 10 व्या हंगामासाठी सुरू असलेल्या लिलाव प्रक्रियेत इराणचा युवा खेळाडू शाडलूच्या नावावर बोली लागली. डिफेंडर शाडलूला खरेदी करण्यासाठी पुणेरी पलटण संघाने 2 कोटी 35 लाख रुपयांची बोली लावली आणि त्याला आपल्या संघात सामील केलं.