Priyanka Mohite Satara : साताऱ्यामध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय प्रियांका मोहिते या गिर्यारोहक तरुणीनं किमया करत साऱ्या जगात नावलौकिक मिळवला आहे. साताऱ्याच्या या लेकिनं जगातील सर्वात उंच तिसऱ्या क्रमांकाचे शिखर सर केले आहे. खडतर चढाई असणाऱ्या कांचनगंगा या पर्वतशिखरावर तिरंगा फडकवण्याचा पराक्रम गिर्यारोहक प्रियांका मोहिते हिने केला आहे. ही किमया करणारी प्रियांका पहिली भारतीय महिला ठरली आहे.


साताऱ्याच्या प्रियांका मोहिते हिने गुरुवारी सायंकाळी चार वाजून 52 मिनीटांनी कांचनगंगा शिखर सर करण्याची मोहिम फत्ते केली. प्रियांकाच्या या यशस्वी मोहिमेनंतर कुटुंबियांनी व साताऱ्यातील गिर्यारोहक प्रेमींनी फटाके फोडून आनंद साजरा केला. लवकरच प्रियांका भारतात परतणार असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली.


कांचनगंगा हे हिमालय पर्वत रांगातील एक उंच पर्वतशिखर आहे.  माउंट एव्हरेस्ट व के-२ यांच्यानंतरचे कांचनगंगा हे तिसरे सर्वात उंच शिखर आहे. हे पर्वतशिखर भारताच्या सिक्कीम राज्यात आहे. याची उंची तब्बल 8,586 मीटर म्हणजेच 28 हजार 169 फूट इतकी आहे.


अन्नपूर्णा शिखरावर तिरंगा फडकवणारी प्रियंका मोहिते पहिली भारतीय महिला
प्रियांका मोहिते हिनं 16 एप्रिल 2021 ला दुपारी, 1.30 वाजता अन्नपूर्णा पर्वतावर यशस्वी चढाई केली. असं करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. माऊंट अन्नपूर्णा हे पर्वत हिमालयाचा एक भाग असून ते नेपाळमध्ये स्थित आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची 8 हजार फुटांपेक्षाही जास्त आहे. यापूर्वी प्रियंकाने 2013 मध्ये जगातील सर्वाधिक उंचीच्या समजल्या जाणाऱ्या, समुद्रसपाटीपासून 8,849 मीटर इतक्या उंचीवर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्ट पर्वताची चढाई केली होती. तर, 2016 मध्ये माऊंट किलिमंजारो आणि 2018 मध्ये माउंट ल्होत्से, माउंट मकालूवरही चढाई केली होती. 


दरम्यान, प्रियांका मोहिते हिची सध्याची एकंदर कामगिरी अनेकांनाच कौतुकाची वाटत आहे. प्रियांका मोहितेच्या कामगिरीवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. 


हे देखील वाचा-