मुंबई : विश्वविजेत्या अंडर-19 भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ आता सीनियर भारतीय संघापर्यंत पोहोचला आहे. हा मुंबईकर फलंदाज टीम इंडियाच्या जर्सीत लवकरच मैदानात दिसण्याची शक्यता आहे.


इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पुढच्या कसोटीत सलामीवीर जोडीत बदल होण्याची दाट शक्यता आहे. कर्णधार विराट कोहलीने केएल राहुलवर सातत्याने विश्वास दाखवला. मात्र त्याला खास कामगिरी करता आलेली नाही. आता मालिकेत 3-1 ने पिछाडीवर पडलेली टीम इंडिया पृथ्वी शॉला सलामीला उतरवण्याची शक्यता आहे.

केएल राहुल मालिकेतील चार कसोटी सामन्यांमध्ये खेळला. मात्र एकदाही तो 40 धावांचा आकडा पार करु शकला नाही. या मालिकेत त्याने चार सामन्यांमध्ये एकूण 113 धावा केल्या आहेत.

चौथ्या कसोटीपासूनच पृथ्वी शॉ फलंदाजीचा कसून सराव करत आहे. त्यामुळे येत्या आठ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या ओव्हल कसोटीत त्याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळू शकतं, असा अंदाज बांधला जात आहे.

आतापर्यंत खेळलेल्या 14 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये पृथ्वी शॉने शानदार कामगिरी केली आहे. त्याने या सामन्यांमध्ये 56 च्या सरासरीने 1418 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये सात शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.

नुकत्याच इंग्लंडमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेत पृथ्वी शॉने तुफान खेळी केली होती. वेस्ट इंडिज अ, लिसेस्टरशायर, ईसीबी XI यांसारख्या संघांविरुद्ध खेळताना त्यांने धावांचा रतिब घातला. ज्यामुळे त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला.

पृथ्वी शॉला मालिकेत अखेरच्या आणि पाचव्या कसोटीत संधी दिली जाऊ शकते. कारण, मालिका हातातून गेल्यानंतर भारताकडे आता गमावण्यासारखं काहीही राहिलेलं नाही.