काठमांडू : कैलाश मानसरोवर यात्रा सुरु होताच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वादात सापडले. त्यांनी काठमांडूमध्ये मांसाहार केल्याचं वृत्त नेपाळच्या मीडियाने दिलं आणि नवा वाद सुरु झाला. मात्र यानंतर रेस्टॉरंटने स्पष्टीकरण देत हे वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे.



एबीपी न्यूजनेही सत्य जाणून घेण्यासाठी या वृत्ताची पडताळणी केली. वूटू रेस्टॉरंटच्या फेसबुक पेजवर एबीपी न्यूजला हा फोटो मिळाला, ज्यामध्ये ते वूटू रेस्टॉरंटमध्ये गेल्याची पुष्टी झाली. म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी त्यांच्या टीमने हॉटेलमध्ये जेवण केलं होतं या दाव्यालाही बळ मिळालं.

राहुल गांधींनी मांसाहारी पदार्थ ऑर्डर केला, वेटरचा दावा

रेस्टॉरंटच्या वेटरशी एबीपी न्यूजने बातचीत केली. वेटरने सांगितलं, की ''राहुल गांधींनी नेवारी डिश ऑर्डर केली, ज्यात चिकन मोमो, चिकन कुरकुरे आणि बंदेल डीशचा समावेश होता.'' यानंतर एकच वाद सुरु झाला आणि राहुल गांधींनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला.

रेस्टॉरंटचं स्पष्टीकरण

वूटू रेस्टॉरंटने फेसबुकवर आपलं स्पष्टीकरण जारी केलं, ज्यामध्ये राहुल गांधींनी मांसाहार केल्याचं खोटं असल्याचं म्हटलं आहे. ''राहुल गांधींनी वूटू रेस्टॉरंटमध्ये काय खाल्लं याची मीडियाकडून चौकशी केली जात आहे. आम्ही हे स्पष्ट करतो, की त्यांनी मेन्यू पाहून शुद्ध शाकाहारी जेवण मागवलं. वुटूने खाण्याबाबत कोणत्याही मीडियाला माहिती दिलेली नाही,'' असं वूटू रेस्टॉरंटने आपल्या स्पष्टीकरणात म्हटलंय.



ही देव आणि दानवांची लढाई : काँग्रेस

काँग्रेसनेही हे वृत्त निराधार असल्याचं म्हटलं होतं. ''राहुल गांधींनी शुद्ध शाकाहारी जेवण केल्याचं हॉटेलने स्पष्ट केलं असल्यामुळे हा वाद निरर्थक आहे. हा भाजपचा अजेंडा आहे. भाजपला राहुल गांधींच्या मानसरोवर यात्रेत विघ्न आणायचं आहे. ही देव आणि दानवांची लढाई आहे,'' असं काँग्रेसने म्हटलं आहे.

बारा दिवस मानसरोवर यात्रा

मानसरोवर यात्रेसाठी दिल्लीहून निघालेले राहुल गांधी 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे पाच वाजता काठमांडूमध्ये हॉटेल र्याडिसेनमध्ये थांबले होते. मानसरोवर यात्रेसाठी ते आता काठमांडूहून चीनच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांची ही यात्रा 12 दिवस चालणार आहे.