मुंबई : टीम इंडियाच्या शिलेदारांना वाटलं नव्हतं त्यापेक्षा वेस्ट इंडिजची फलंदाजी भलतीच तगडी निघाली. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी गुवाहाटीच्या पहिल्या वन डेत 322 धावांचा डोंगर उभारला, तर विशाखापट्टणमच्या वन डेत त्यांनी भारताच्या 322 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करून सामना चक्क टाय केला. पुण्यातील तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने टीम इंडियाचा 43 धावांनी धुव्वा उडवला.


गेल्या तीन सामन्यात सहा फलंदाज आणि पाच गोलंदाजांसह खेण्याचा निर्णय फेल गेल्यानंतर भारतीय संघाला अष्टपैलू खेळाडूंची प्रमुख उणीव भासू लागली. अखेर उर्वरित दोन सामन्यांसाठी भारतीय संघात केदार जाधवचा करण्यात आलेला समावेश करण्यात आला आहे.

भारत वि. वेस्ट इंडिजचा चौथा सामना वन डे सामना आज मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात महाराष्ट्राच्या केदार जाधवच्या कामगिरीवर नजर राहणार आहे. आशिया चषकात दुखापतग्रस्त झालेल्या केदार जाधवला पहिल्या तीन वन डे सामन्यांसाठी निवडण्यात आलं नव्हतं. पण चौथ्या आणि पाचव्या वन डेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

विंडीजविरुद्धच्या मालिकेतील तिन्ही सामन्यांत दोन्ही आघाडय़ांवर भारत कुठे ना कुठे मागे पडताना दिसून आलं आहे. असं असून देखील या मालिकेत सलग तिन्ही सामन्यांत विराटने शतके ठोकली आहेत. आज खेळल्या जाणाऱ्या चौथ्या वन डे सामन्यातही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र विराट आणि भारतासाठी या सामन्यात विजय मिळवणं जास्त आवश्यक आहे.

भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा , शिखर धवन, अंबाती रायुडू, रिषभ पंत, महेंद्रसिंग धोनी , रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, खलील अहमद, उमेश यादव, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव.

वेस्ट इंडिज संघ

जेसन होल्डर (कर्णधार), फॅबियान अ‍ॅलीन, सुनील अ‍ॅम्ब्रिस, देवेंद्र बिशू, चंदरपॉल हेमराज, शिम्रॉन हेटमायर, शाय होप, अल्झारी जोसेफ, अ‍ॅश्ले नर्स, किमो पॉल, रोव्हमन पॉवेल, केमार रोच, मार्लन सॅम्युअल्स, ओशाने थॉमस, ओबॅड मॅकॉय, किरॉन पॉवेल.