सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील वन डे सामन्यांच्या मालिकेला आज सिडनीतून सुरुवात होत आहे. इंग्लंडमधील आगामी विश्वचषकाच्या पूर्वतयारीसाठी टीम इंडियाला ही मालिका महत्वाची ठरणार आहे. ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका विजय साजरा करणारी टीम इंडिया आता वन डे विश्वचषकाच्या आव्हानासाठी सज्ज होत आहे.
विराट कोहलीची टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. या मालिकेतला सलामीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलियातील वन डे सामन्यांच्या मालिकेत भारतीय फलंदाजीची मदार ही प्रामुख्यानं कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यावर राहिल. त्या तिघांनीही 2018 या कॅलेंडर वर्षात धावांचा रतीब घातला आहे. विराटनं गेल्या वर्षी 14 सामन्यांत सहा शतकं आणि तीन अर्धशतकांसह 1202 धावा फटकावल्या आहेत. रोहितनंही 19 सामन्यांत 1030 धावांचा डोलारा उभारताना तीन शतकं आणि पाच अर्धशतकं ठोकली आहेत. शिखर धवननं गेल्या वर्षभरात तीन शतकं आणि दोन अर्धशतकांसह 897 धावांचं योगदान दिलं आहे. त्या तिघांशिवाय अनुभवी महेंद्रसिंग धोनी, अंबाती रायुडू आणि केदार जाधव यांच्यामुळे भारतीय फलंदाजी आणखी मजबूत झाली आहे.
भारतीय संघाची ऑस्ट्रेलियन भूमीवरची आजवरची वन डेतली कामगिरी ही तितकी समाधानकारक नाही. भारतानं ऑस्ट्रेलियातील 48 वन डे सामन्यांत तब्बल 35 वेळा पराभवाची कटू चव चाखली आहे. 1985 सालची वर्ल्ड चॅम्पियनशीप आणि 2007 सालच्या तिरंगी मालिकेचा अपवाद वगळता भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात मोठं यश मिळालेलं नाही.
विराट कोहलीची टीम इंडिया त्या साऱ्या अपयशाचं उट्टे काढायला सज्ज झाली आहे. विराटची टीम इंडिया हा आजच्या घडीचा सर्वोत्तम वन डे संघ आहे. आयसीसीच्या क्रमवारीत टीम इंडिया दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया सहाव्या स्थानावर आहे. आयसीसी क्रमवारीतील ही तफावत लक्षात घेता या मालिकेत टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला भारी असल्याचं चित्र समोर उभं राहातं.
ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका गाजवणाऱ्या जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार आणि खलील अहमद नव्या चेंडूवर वेगवान मारा करण्यासाठी सज्ज आहेत. रवींद्र जाडेजासह मनगटी स्पिनर कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांच्यावर फिरकीची धुरा राहील.
ऑस्ट्रेलियातल्या कसोटी मालिकेत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानं टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर टीम इंडिया वन डे सामन्यांच्या आव्हानासाठी मैदानात उतरेल. विराटच्या फौजेनं कसोटीपाठोपाठ वन डेतही कांगारुंना धूळ चारली तर ते यश आगामी विश्वचषकासाठीचा आत्मविश्वास उंचावणारा ठरेल. इंग्लंडमधील आगामी विश्वचषक अवघ्या साडेचार महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्या विश्वचषकाची तयारी करायची तर टीम इंडियाच्या हाताशी आता 13 वन डे आणि पाच ट्वेन्टी ट्वेन्टी सामने आहेत.