केपटाऊन : विराट कोहलीच्या टीम इंडियाला केपटाऊन कसोटीत अखेर लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा दुसरा डाव 135 धावांत गुंडाळून, 72 धावांनी दणदणीत विजय साजरा केला.

विराट कोहलीच्या लग्नाचा सनई चौघडा इटलीत वाजला, मग दिल्ली आणि मुंबईतल्या रिसेप्शनमध्ये बँडबाजा घुमला आणि भारतीय फलंदाजांची बारात निघाली ती केपटाऊनमध्ये...

विजयासाठीचं लक्ष्य केवळ 208 धावांचं होतं. त्यात दक्षिण आफ्रिकेची डेल स्टेन ही मुलुखमैदान तोफही निकामी झाली होती. पण टीम इंडियाची दुसऱ्या डावात दाणादाण उडवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला तीनच वेगवान अस्त्र पुरेशी ठरली. त्यांनी विराटसेनेचा दुसरा डाव अवघ्या 135 धावांत गुंडाळून, टीम इंडियावर 72 धावांनी लाजिरवाणा पराभव लादला.

बीसीसीआय आणि टीम इंडियाची पूर्वतयारी अंगलट?

तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसाने वाया जाऊनही चौथ्या दिवशीच झालेला हा पराभव इतका बोचरा आहे की, दक्षिण आफ्रिकेचीही दोन्ही डावांत दाणादाण उडाली, असं म्हणून टीम इंडियाची अब्रू झाकता येणार नाही. पण भारतीय फलंदाजांनी केपटाऊनवर एकदा नाही, तर दोनदा घातलेल्या लोटांगणापेक्षाही या पराभवाचं कारण बीसीसीआय आणि टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या दृष्टीने केलेल्या शून्य पूर्वतयारीत दडलं आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निघण्याआधी, खरं तर तिथल्या वेगवान आणि बाऊन्सी खेळपट्ट्यांवर धावांची रास कशी उभी करता येईल, या दृष्टीने भारतीय संघाने पूर्वतयारी करणं अपेक्षित होतं. त्यासाठी बीसीसीआयने भारतात किंवा दक्षिण आफ्रिकेत शिबिराची आखणी करायली हवी होती. भारतीय संघाने कसोटी मालिकेआधी दक्षिण आफ्रिकेत सराव सामने खेळणं आवश्यक होतं. पण कर्णधार विराट कोहली लग्न, हनिमून आणि रिसेप्शनमध्ये अडकला आणि बाकीची टीम इंडिया दुबळ्या श्रीलंकेविरुद्धच्या लुटूपुटूच्या वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये व्यस्त राहिली. पण टेलिव्हिजन ब्रॉडकास्टरच्या फायद्यासाठी श्रीलंकेशी खेळून दक्षिण आफ्रिका दौऱ्याची तयारी होणार तरी कशी? असा प्रश्न उरतो.

विराट कोहलीची टीम इंडिया सलग नऊ कसोटी मालिका जिंकून दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली होती. पण टीम इंडियाने त्या 9 पैकी सहा कसोटी मालिका मायदेशात, दोन श्रीलंकेत, तर एक वेस्ट इंडिजमध्ये जिंकली होती. भारतात, श्रीलंकेत किंवा विंडीजमध्ये कसोटी मालिका जिंकणं वेगळं आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणं यात फरक आहे, याची बीसीसीआय आणि भारतीय संघव्यवस्थापनाला कल्पना यायला हवी होती.

भारतीय संघाला गेल्या 25 वर्षांत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. भारताने दक्षिण आफ्रिकेत 6 पैकी पाच कसोटी मालिकांमध्ये हार स्वीकारली आहे, तर केवळ एकमेव कसोटी मालिका अनिर्णित राखण्यात भारताला यश आलं आहे.

या 6 कसोटी मालिकांच्या कालावधीत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकी भूमीवर 17 कसोटी सामन्यांध्ये खेळला. त्यापैकी केवळ दोन कसोटी सामने भारताला जिंकता आले आहेत.

हा सारा इतिहास समोर असतानाही, कोणतीही पूर्वतयारी न करता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणं म्हणजे आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखं होतं. केपटाऊनमध्ये तेच घडलं. आता टीम इंडिया सेन्चुरियन आणि जोहान्सबर्गची कसोटी वाचवणार का, हाच प्रश्न आहे.