मुंबई : भारतीय संघाचा जलद गोलंदाज प्रवीण कुमारने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. प्रवीण कुमारने 11 वर्षाच्या मोठ्या कारकिर्दीनंतर क्रिकेटपासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. निवृत्तीनंतर प्रवीणने प्रशिक्षक म्हणून भविष्यात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.


निवृत्तीनंतर इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण म्हणाला की, "मी माझ्या कारकिर्दीत जेवढं क्रिकेट खेळलो, मनापासून खेळलो. मनापासून गोलंदाजी केली. अनेक नवीन गोलंदाज संधीची वाट पाहत आहेत. त्यामुळे मी त्यांना फार काळ रोखू शकत नाही. मी खेळलो तर एक जागा अडकून राहील. दुसऱ्या खेळाडूंच्या भविष्याबाबत विचार करणेही गरजेचे आहे. माझ्या निवृत्तीची वेळ आली आहे आणि मी ती स्वीकारली आहे. मी आनंदी आहे आणि मला एवढी मोठी संधी मिळाली त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो."


प्रवीण कुमारने 2007 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दिला सुरूवात केली होती. 2012 मध्ये प्रवीण कुमारने शेवटचा सामना पाकिस्तान विरुद्ध खेळला होता. तर कसोटीमध्ये खेळण्याची संधी प्रवीण कुमारला 2011 मध्ये मिळाली होती. तर 2008 साली प्रवीण कुमार टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.


प्रवीण कुमारने भारतासाठी 6 कसोटी सामन्यात 27 विकेट, 68 एकदिवसीय सामन्यात 77 विकेट तर 10 टी-20 सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत. प्रवीण कुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येही आपली छाप पाडली. प्रवीण कुमारने 66 सामन्यात 267 विकेट घेतल्या आहेत. तर लिस्ट 'ए' क्रिकेटमध्ये प्रवीणने 139 सामन्यात 185 विकेट घेतल्या आहेत.