Thomas Cup 2022 : बॅटमिंटन खेळाची एक भव्य स्पर्धा असणाऱ्या थॉमस कपमध्ये (Thomas Cup) भारतानं रविवारी इंडोनेशियाला मात देत विजय मिळवला. 73 वर्षात पहिल्यांदाच भारतानं मिळवलेल्या या विजयामागे संपूर्ण संघाची कामगिरी होती. दरम्यान अंतिम सामन्यात प्रणॉय एच.एस.ला कोर्टवर उतरण्याची संधी मिळाली नाही. पण भारताला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्यात त्याचाही मोलाचा वाटा होता. दरम्यान या महत्त्वाच्या विजयानंतर प्रणॉयने एनडीटीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या विजयामागे एका व्हॉट्सअॅप ग्रुपचा (Whatsapp Group) कसा हात आहे, हे सांगितलं.


प्रणॉयने विजयानंतरच्या मुलाखतीत सांगितलं की स्पर्धेपूर्वी त्याने एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता, ज्याला त्याने 'Its Coming Home' (तो घरीच येणार) असं नाव देत कप भारतातच येणार असा निर्धार करणारा ग्रुप तयार केला होता. या नावामुळे सर्वांनाच स्फुर्ती आली, तसंच अनेक गोष्टी एकमेकांशी शेअर करताना सर्वांना एकत्र बांधण्याचं काम या ग्रुपने केल्याचंही प्रणॉय म्हणाला. 


भारताचा पहिला वहिला विजय


आतापर्यंत सर्वाधिक 14 वेळा इंडोनेशियाने, 10 वेळा चीनने, मलेशियाने 5 वेळा तर जपान आणि डेन्मार्क यांनी एक-एक वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. ज्यानंतर यंदा 2022 साली भारताने या स्पर्धेत चॅम्पियन इंडोनेशियाला मात देत पहिलं वहिला चषक मिळवला आहे. त्यामुळे ही स्पर्धा जिंकणार भारत जगातील सहावा देश बनला आहे. यंदा भारतीय बॅडमिंटन संघाने सुरुवातीपासून अप्रतिम कामगिरी सुरु ठेवली. त्यांनी आधी डेन्मार्कला सेमीफायनलमध्ये मात दिल्यानंतर अंतिम सामन्यात इंडोनेशियाला सुरुवातीच्या तीन सामन्यात मात दिली.


यावेळी सर्वात आधी स्पर्धेतील पहिला सामना पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने (Lakshya Sen) जिंकला. त्याने इंडोनेशियाच्या अँथॉनी गिंटिंगचा 8-21, 21-17 आणि 21-16 असा पराभव केला. त्यानंतर पुरुष दुहेरी सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने इंडोनेशियाच्या मुहम्मद एहसान आणि केविन संजया यांना 18-21, 23-21, 21-19, अशा फरकाने मात दिली. ज्यानंतर तिसऱ्या सामन्यात किंदम्बी श्रीकांतने (kidambi srikanth) इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीला 21-15, 22-21 च्या फरकाने मात देत सामना आणि कप भारताच्या नावे केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या