आज युरोकपच्या मेगा फायनलचा थरार, रोनाल्डोच्या पोर्तुगालची टक्कर फ्रान्सशी
एबीपी माझा वेब टीम | 10 Jul 2016 09:48 AM (IST)
पॅरिस(फ्रान्स): ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ आणि आणि ह्युगो लॉरिसची फ्रेन्च टीम या युरोपातल्या दोन बलाढ्य संघांमध्ये युरो कपसाठी अंतिम लढाई रंगणार आहे. पॅरिसच्या स्टेड दी फ्रान्समध्ये आज हा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार 11 जुलैला रात्री साडेबारा वाजता या लढतीचा किकऑफ होईल. पोर्तुगालने वेल्सला, तर फ्रान्सने वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीला धूळ चारुन युरो कपची फायनल गाठली. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अॅन्टॉइन ग्रिझमन या दोघांमधलं द्वंद्व या सामन्याचं खास आकर्षण असणार आहे. फ्रान्ससाठी ग्रिझमननं सहा सामन्यांत सहा गोल झळकावले आहेत. तर रोनाल्डोच्या नावावर तीन गोल जमा आहेत. फ्रान्सने घरच्या मैदानात खेळताना 1984 साली युरो कप आणि 1998 साली विश्वचषक जिंकला होता. साहजिकच या फायनलमध्ये फ्रान्सचं पारडं जड मानलं जातं आहे.