मुंबईः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे धरणांतील जलसाठा देखील वाढण्यास मदत झाली आहे.

 

मुंबई आणि कोकणसह राज्यात चांगला पाऊस झाला आहे. पावसाने उघडीप घेताच बळीराजाची शेती कामाची लगबग पाहायला मिळत आहे.

 

पश्चिम महाराष्ट्र

पुण्यात पहाटेपासून जोरदार पाऊस झाला. सातारा, महाबळेश्वर या परिसरातही चांगला पाऊस पडला आहे. कोयना धरणातील पाणी पातळी गेल्या 24 तासांत 2 टीएमसीने वाढली असून 29 हजार क्यूसेक्स वेगाने पाणी येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धरणातील पाणी साठ्यांमध्येही चांगली वाढ झाली आहे.

 

अहमदनगर जिल्ह्यात मुळा नदिला पूर आल्यामुळे पारनेर आणि संगमनेर तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. नदीवरील मांडवे पूल पाण्याखाली गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अकोले तालुक्यातही पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे परिसरात दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

 

विदर्भात मुसळधार

गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत झाला असून मोबाईल सेवाही ठप्प झाली आहे. पर्लकोटा नदीच्या पुरामुळे 200 गावांचा संपर्क तुटला आहे. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, अकोला या जिल्ह्यांसह विदर्भातील अनेक भागात चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

 

नाशिकमध्ये विक्रमी पाऊस

नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 600 मिमी पावसाची नोंद झाली आहे. नाशिकसह इगतपुरी, कसारा, त्र्यंबकेश्वर या भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील काही भाग जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे.