पूनम राऊत आणि दीप्ती शर्मा या भारतीय जोडीनं महिलांच्या वन डे क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम रचला. पूनम आणि दीप्ती या वन डेत तीनशेहून अधिक धावांची भागीदारी रचणाऱ्या पहिल्या महिला क्रिकेटर्स ठरल्या.

दक्षिण आफ्रिकेतील चौरंगी वन डे मालिकेत आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात पूनम आणि दीप्तीनं सलामीला 320 धावांची भागीदारी रचली. त्यात दीप्तीचा वाटा होता 160 चेंडूंमधल्या 188 धावांचा. तिनं 27 चौकार आणि दोन षटकारांची बरसातही केली.

महिलांच्या वन डे क्रिकेटमधली ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या ठरली. तर मुंबईकर पूनम राऊतनं रिटायर्ड हर्ट होण्याआधी 109 धावांची खेळी उभारून दीप्तीला छान साथ दिली. पूनमनं 116 चेंडूंमधली खेळी 11 चौकारांनी सजवली.

या विश्वविक्रमी भागीदारीमुळंच भारतानं 50 षटकांत 2 बाद 358 धावांची मजल मारता आली. वन डे क्रिकेटमध्ये भारताच्या महिला संघांनं नोंदवलेली ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. भारतीय महिलांनी मग आयर्लंडचा डाव 109 धावांत गुंडाळून 249 धावांनी विजय साजरा केला. राजेश्वरी गायकवाडनं चार तर शिखा पांडेनं तीन विकेट्स काढून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.