बंगळुरु: टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक या नात्यानं झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत अनिल कुंबळेनं आपल्या विनयशील स्वभावाची झलक दाखवून दिली.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या सराव शिबिराला बुधवारी सकाळी बंगळुरूत सुरुवात झाली. शिबिराच्या सलामीलाच मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत रवी शास्त्रीला मुख्य प्रशिक्षकाच्या निवडीतून डावलण्यात आल्याच्या वादावर प्रश्न येणं स्वाभाविक होतं. आणि त्यासाठी कुंबळेही तयार होता.
भारतीय क्रिकेटमध्ये मी, शास्त्री किंवा अन्य कुणाही पदाधिकाऱ्यापेक्षा खेळाडू अधिक महत्त्वाचे आहेत, असं सांगून कुंबळेनं त्या प्रश्नाला छान बगल दिली. यावेळी टीम इंडिया बद्दल कुंबळे म्हणाला की, 'कायम चांगला खेळ करण्यासाठी टीम इंडियाला घरच्या मैदानावरच नाही तर परदेशातही चांगली कामगिरी करावा लागेल.'