लाहोर : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीने बीसीसीआयकडे भारत पाकिस्तान यांच्यातील मालिका रद्द केल्यामुळे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. पीसीबीच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी आयसीसीकडे बीसीसीआयने भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात 2014 मध्ये उभय देशांनी 2015 ते 2023 या काळात सहा मालिका खेळण्याचा करार झाला होता. मात्र दोन्ही देशांच्या सीमेवरील तणाव पाहता बीसीसीआयने पाकिस्तानसोबत क्रिकेटमध्ये कसलेही संबंध ठेवायचे नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

भारत आणि पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मालिकेतील एका गटात ठेवू नये, अशी मागणी नुकतीच बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी केली होती.

भारताने पाकशी मालिका खेळावी अन्यथा नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पाकिस्तानने आयसीसी आणि बीसीसीआयकडे केली असल्याचं वृत्त पाकिस्तानी वृत्तपत्र 'द डॉन'ने नजम सेठी यांच्या हवाल्याने दिलं आहे.

आम्ही आयसीसीकडेही नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कारण मालिका खेळण्याचं वचन दिल्याने पीसीबीला आर्थिक नुकसान झालं आहे, असं सेठी यांनी सांगितलं.

भारत आणि पाकिस्तानमध्ये मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यानंतर एकही मालिका खेळण्यात आलेली नाही.