मुंबई : आयपीएलचे सामने महाराष्ट्रातच होणार, अशी माहिती आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी दिली आहे. दुष्काळग्रस्तांना बीसीसीआय सर्वोतोपरी मदत करेल, असं आश्वासनही देण्यात आलं आहे.


 
एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ असताना आयपीएलचे सामनेही खेळवले जाणार आहेत. दुष्काळ असतानाही जर आयपीएल सामन्यांची चैन होणार असेल तर आयोजकांकडून पाण्यावर 1 हजार रुपये प्रति लीटर दराने कर आकारण्यात यावा, आणि त्या पैशातून दुष्काळग्रस्तांना पाणी पुरवावं अशी मागणी करणारी याचिका केतन तिरोडकर यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती.

 
आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियम, नवी मुंबईतील डी वाय पाटील, पुण्यातील सहारा स्टेडियमवर आणि नागपुरात सामने खेळवले जाणार आहेत. एका मॅचसाठी जवळपास 22 लाख लीटर पाणी वापरण्यात येतं असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. 2013 च्या आयपीएलमध्ये महाराष्ट्रात तीन ठिकाणी मिळून जवळपास 65 लाख लीटर पाणी वापरण्यात आलं होतं, असंही त्यांनी याचिकेत म्हटलं आहे.

 
एकीकडे राज्य सरकार लातूर जिल्ह्याला 50 बोगींच्या ट्रेनमधून पाणी पुरवठा करण्याचा विचार करत आहे. 55 हजार लीटरची एक बोगी या हिशोबाने 30 लाख लीटरचा पाणी पुरवठा करण्यात येईल. जेणेकरुन प्रत्येक कुटूंबाला 20 लीटर पाणी पाण्याचा पुरवठा करण्यात येईल.

 
दुसरीकडे एका सामन्यासाठी पिच तयार करताना किमान 60 हजार लीटर पाणी एका दिवसात वापरण्यात येतं. त्यामुळे राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांची बोली लावून खेळाडूंचा लिलाव लावून हजारो कोटींची उलाढाल करणाऱ्या बीसीसीआयसारख्या गर्भश्रीमंत संघटनेकडून वॉटर टॅक्सच्या रुपात मोठी रक्कम आकारुन राज्यातील दुष्काळाची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी या
याचिकेत करण्यात आली होती.