आयपीएलच्या प्ले ऑफचं चित्र स्पष्ट
एबीपी माझा वेब टीम | 14 May 2017 07:26 PM (IST)
मुंबई : स्टीव्हन स्मिथच्या पुण्यानं ग्लेन मॅक्सवेलच्या पंजाबचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये धडक मारली. आयपीएलच्या 14 सामन्यांमधला पुण्याचा हा नववा विजय ठरला. या विजयासह पुण्यानं 18 गुणांची कमाई करून आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबईपाठोपाठ दुसरं स्थान पटकावलं. त्यामुळं 16 मे रोजी वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या क्वालिफायर वनमध्ये मुंबई आणि पुण्याच्या संघांत मुकाबला पाहायला मिळेल. त्यानंतर 17 मे रोजी बंगलोरमध्ये होत असलेल्या एलिमिनेटर सामन्यात तिसऱ्या स्थानावरच्या हैदराबादची गाठ कोलकात्याशी पडेल. क्वालिफायर वनमधल्या पराभूत आणि एलिमिनेटरमधल्या विजयी संघांमधला सामना 19 मे रोजी बंगलोरमध्ये खेळवण्यात येईल. क्वालिफायर वन आणि क्वालिफायर टूमधल्या विजयी संघांमध्ये रविवार, 21 मे रोजी हैदराबादमध्ये अंतिम सामना होईल.