श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात बुरहान वाणीनंतर ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचे नेतृत्त्व करणारा जाकिर मुसाने संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी संघटनांमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र आहे.
दोन ऑडिओ टेपच्या माध्यमातून हिजबुल मुजाहिद्दीनमधून बाहेर पडल्याची घोषणा मुसाने केली. जम्मू-काश्मीर पाकिस्तानाला मिळवून देण्यासाठी 1989 पासून हिजबुल मुजाहिद्दीन ही संघटना दहशतवादी कारवाया करत आहे.
हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रवक्ता सलीम हाश्मी याने मुजफ्फराबादमध्ये सांगितले, “मुसाच्या कोणत्याही विधानासाशी यापुढे हिजबुल मुजाहिद्दीनचं घेणं-देणं नाही.”
5 मिनिट 40 सेकंदांचा मुसाचा ऑडिओ सोशल मीडियावरुन समोर आला. यामध्ये फुटीरतावादी नेत्यांना धमकी देण्यात आली असून, सीरिया आणि इराकच्या धर्तीवर आयसिसद्वारे स्थापन केलेल्या व्यवस्थेनुसार जम्मू-काश्मीरमध्ये खलिफा स्थापन करण्याच्या उद्देशात दखल देऊ नये, अशी धमकीही देण्यात आली आहे.
पोलिस महासंचालक एसपी वैद यांनी ऑडिओमधील आवाजाची तपासणी केली असता, तो आवाज मुसाचा असल्याचे समोर आले. आतापर्यंत हे दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरला स्वतंत्र राज्य किंवा पाकिस्तानात विलिन करण्याच्या मागणीपुरते मर्यादित होते. मात्र, आता आयसिसच्या विचारधारेचाही उल्लेख आल्याने चितेंत वाढ झाली आहे.
तर दुसरीकडे, याच आठवड्यात सैय्यद अली शाह गिलानी, मीरवाइज उमर फारुक आणि यासीन मलिक यांसारख्या हुर्रियत नेत्यांनी संयुक्तपणे सांगितले होते की, काश्मीरच्या संघर्षाचं आयसिस किंवा अल कायदासारख्या संघटनांशी काहीही देणं-घेणं नाही.