लखनौ : गीता, बबिता, रितू आणि संगीता या फोगाट भगिनींच्या बेशिस्त वर्तनाला कंटाळून, भारतीय कुस्ती फेडरेशननं त्या चौघींनाही लखनौमधल्या राष्ट्रीय शिबिराची दारं बंद केली आहेत. त्यामुळं त्या चौघींनाही, एशियाडसाठी जून महिन्यात आयोजित राष्ट्रीय निवड चाचणीत सहभागी होता येणार नाही.


भारतीय कुस्ती फेडरेशननं १० ते २५ मे या कालावधीत लखनौमध्ये राष्ट्रीय शिबिराचं आयोजन केलं आहे. या शिबिरासाठी निवड झालेल्या पैलवानांना तीन दिवसांत लखनौमध्ये दाखल होण्याचा आदेश फेडरेशननं दिला होता. पण गीता, बबिता, रितू आणि संगीता या फोगाट भगिनींसह १३ पैलवानांनी लखनौ शिबिरात हजेरी लावली नाही.

आपल्या गैरहजेरीबाबत त्यांनी भारतीय कुस्ती फेडरेशनसोबत संपर्कही ठेवला नाही. त्यामुळं फेडरेशननं या १३ पैलवानांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे.