पणजी : कर्नाटकचा बदला गोव्यात घेण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. गोव्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. जो न्याय कर्नाटकला लावला तोच गोव्यात लावण्याची मागणी काँग्रेस करणार आहे.


गोव्यातील काँग्रेसचे प्रभारी चेल्ला कुमार आज गोव्याला दाखल होणार असून ते आणि पक्षाचे इतर नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. गोव्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण द्यावं, अशी मागणी काँग्रेस करणार आहे. गरज पडल्यास राजभवनात काँग्रेस आपल्या सर्व आमदारांना हजर करणार आहे, अशी माहिती पक्षाचे नेते यातिश नाईक यांनी सांगितलं.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 104 जागांसह भाजप मोठा पक्ष ठरला. परंतु बहुमत मिळवता आलं नाही. मात्र मोठा पक्ष म्हणून भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर राज्यपाल वजुभाई वाला यांनीही भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलं. तसंच येत्या 15 दिवसात बहुमत सिद्ध करा, असंही राज्यपालांनी सांगितलं. अखेर आज बीएस येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली.

दुसरीकडे 2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 17 जागांसह मोठा पक्ष ठरुनही 13 जागा मिळवलेल्या भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे कर्नाटकचा न्याय गोव्यातही लागू करावा, अशी मागणी करत मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचा दावा काँग्रेसने केला आहे.


गोव्यात काय झालं होतं?

गोवा विधानसभा 40 सदस्यांची आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत 40 पैकी काँग्रेसला सर्वाधिक जागा म्हणजे 17 जागा मिळाल्या होत्या. त्यापाठोपाठ, भाजपला 13, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला 3, गोवा फॉरवर्ड पार्टीला 3 जागा मिळाल्या होत्या. तर अपक्षांना 3 तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली होती.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यात, विश्वजित राणे यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर, काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात दाखल होऊन पुन्हा निवडणूक लढवून भाजपचे आमदार झाले.

त्यामुळे भाजप आणि समर्थकांची एकूण संख्या 21 वर पोहोचली. तोच बहुमताचा आकडा होता.

विशेष म्हणजे, निवडणुकीआधी कोणत्याही पक्षाशी युती नसताना आणि निकालानंतर काँग्रेस मोठा पक्ष असतानाही, भाजपने लहान-सहान पक्षांना एकत्र करत, बहुमताचा आकडा पार करुन सरकार स्थापन करण्याचा दावा केला. पर्ययाने गोव्यात मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झालं.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, गोवा विधानसभेत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना बहुमत सिद्ध करायचं होतं. त्यामुळे गोवा विधानसभेतही पर्रिकर सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला.

गोव्यात कुणाला किती जागा?

भाजप - 13

काँग्रेस - 17 (विश्वजीत राणे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसचं संख्याबळ 17 वरुन 16वर)

राष्ट्रवादी काँग्रेस -1

महाराष्ट्रवादी गोमंतक - 3

गोवा फॉरवर्ड पार्टी - 3

अपक्ष/इतर - 3

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018

भाजप 104

काँग्रेस 78

जनता दल (सेक्युलर) 37

बहुजन समाज पार्टी 1

कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1

अपक्ष 1

संबंधित बातम्या

कर्नाटक : बहुमत सिद्ध करताना आकड्यांची जुळवाजुळव कशी असेल?

कर्नाटक LIVE : येडीयुरप्पा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत विराजमान

...तेव्हा 7 दिवसातच येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपद गमावलं होतं!

एकट्या येडियुरप्पांनीच शपथ घेतली, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान!

कर्नाटक सत्तासंघर्ष : रात्री 2 वाजता सुप्रीम कोर्टात काय झालं?

सुप्रीम कोर्टात पहाटे पाचपर्यंत सुनावणी, येडियुरप्पांच्या शपथविधीला हिरवा

राईस मिलचा क्लार्क ते भाजपचा दक्षिणेतील पहिला मुख्यमंत्री