कराची : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) पुन्हा एकदा स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या दोन खेळाडूंचा स्पॉट फिक्सिंगमध्ये समावेश होता का, याची चौकशी पीसीबी करणार असल्याचं वृत्त आहे.


पीसीबीच्या भ्रष्टाचार विरोधी न्यायाधिकरणाच्या सदस्यांच्या समक्ष इंग्लंडच्या राष्ट्रीय गुन्हे शाखेसमोर अधिकाऱ्याने चौकशीदरम्यान पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमल आणि मोहम्मद समी यांचं नाव घेतलं, असं वृत्त 'जंग'ने दिलं आहे.

या दोन्ही खेळाडूंनी पीसीबीच्या भ्रष्टाचार विरोधी न्यायाधिकरणाच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे का, याची पडताळणी केल्याशिवाय त्यांना नोटीस पाठवता येणार नाही, असं बोर्डाच्या सूत्रांनी म्हटलं आहे.

अधिकाऱ्याने चौकशीदरम्यान दिलेल्या जबाबात या दोन्ही खेळाडूंच्या नावांचा उल्लेख आहे. शिवाय सट्टेबाज मोहम्मद युसूफनेही त्यांचं नाव घेतलं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

उमर अकमलला नुकतंच पाकिस्तानच्या संघातून पुन्हा एकदा वगळण्यात आलं आहे. वेस्ट इंडिज दौरा आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या काळात फिटनेसच्या कारणामुळे त्याला बाहेर बसवण्यात आलं होतं. तर मोहम्मद समी 2016 पासून पाकिस्तानकडून खेळलेला नाही.