लाहोर : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) राष्ट्रीय संघाचा सलामीवीर फलंदाज नासिर जमशेदवर 10 वर्षांची बंदी घातली आहे. वेबसाईट ‘ईएसपीएन’च्या वृत्तानुसार, पीसीबीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमांचं वारंवार उल्लंघन केल्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे.

नासिर जमशेदकडून भ्रष्टाचार विरोधी नियमांचं पाच ते सात वेळा उल्लंघन करण्यात आलं. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याच्यावर ही बंद घालण्यात येत आहे. शिवाय त्याला क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारच्या व्यवस्थापकीय पदाची जबाबदारी देण्यासाठी अपात्र घोषित करावं, असं तीन सदस्यीय समितीने आपल्या निकालात म्हटलं.

गेल्या दोन वर्षांमध्ये जमशेदला दुसऱ्यांदा दोषी ठरवण्यात आलं आहे. यापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 2017 पीएसएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चौकशीत सहकार्य न केल्यामुळे त्याच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. ही शिक्षा संपताच त्याच्यावर आता सर्वात मोठी बंदी घालण्यात आली आहे.

जमशेदने पाकिस्तानकडून 48 वन डे, 18 टी-20 आणि दोन कसोटी सामने खेळले आहेत. वन डेमध्ये त्याच्या नावावर तीन शतक आणि आठ अर्धशतकांचा समावेश असून एकूण 1418 धावा त्याच्या खात्यात आहेत. तर टी-20 मध्ये त्याच्या नावावर 363 धावा आहेत.

नासिर जमशेद गेल्या तीन वर्षांपासून पाकिस्तान संघातून बाहेर आहे, तर टी-20 आणि कसोटी संघात गेल्या पाच वर्षांपासून त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.