2014 साली 86 व्या वर्षी 'एम्स'मध्ये कार्डिअॅक अरेस्टने राजकुमारी कौल यांची प्राणज्योत मालवली. त्यावेळी प्रसिद्धीपत्रकामध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या घरातील सदस्य निर्वतल्याचा उल्लेख होता.
मिसेस कौल यांचं व्यक्तिमत्त्व अत्यंत लाघवी असल्याचं भाजपमधील अनेक नेते सांगतात. 'त्या खूप माया करायच्या' असं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज एकदा म्हणाल्या होत्या.
वाजपेयींच्या निवासस्थानी आलेले बरेच फोन त्या उचलायच्या. 'मी मिसेस कौल बोलत आहे' असा त्यांचा मृदू आवाज ऐकायला मिळायचा.
राजकुमारी कौल आहेत तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला होता. दिल्ली युनिवर्सिटीतील एका शिक्षकाची ती कन्या. वाजपेयी यांची ती महाविद्यालयीन मैत्रीण.
अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी झाले, त्यानंतर मिसेस कौल यांची कन्या नमिता भट्टाचार्य आणि तिचं कुटुंब वाजपेयींसोबत 'सात रेसकोर्स रोड'वर राहायला आलं. नमिता आपली मुलगी असल्याचं वाजपेयी सांगायचे. अटलजी आणि मिसेस कौल यांनी आपल्या नात्याला कधीच कुठलं नाव दिलं नाही, ही खासियत आहे.
वाजपेयींची दत्तक कन्या नमिता कौल यांचं कुटुंब
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधल्या प्रसिद्ध व्हिक्टोरिया कॉलेजात शिकताना राजकुमारी कौल आणि अटलजी यांची सर्वप्रथम ओळख झाली. दोघं एकाच वर्गात शिकायचे. राजकुमारी यांचं माहेरचं कुटुंब मोरार भागात राहायचं, त्यानंतर सगळे ग्वाल्हेरला शिफ्ट झाले.
प्राध्यापक बी. एन. कौल यांच्यासोबत राजकुमारी यांनी लगीनगाठ बांधली. त्यानंतर त्या दिल्लीला स्थायिक झाल्या. यानिमित्ताने राजकुमारी आणि अटलजींची पुन्हा गाठभेट झाली.
त्यावेळी मिस्टर कौल रामजस कॉलेजच्या फिलॉसॉफी विभागाचे प्रमुख आणि हॉस्टेलचे वॉर्डन झाले. बलरामपूरमधील निवडणुकीच्या वेळी वाजपेयींची बी. एन. कौल यांच्याशी भेट झाली. मिसेस कौल 'एम्स'मध्ये गरजूंवर मोफत वैद्यकीय उपचार करत असत.
बी. एन. कौल यांच्या निधनानंतर वाजपेयींनी राजकुमारी यांच्या कुटुंबाला आपलंसं केलं. राजकुमारी यांनी वाजपेयींच्या राजकीय जीवनात कधी ढवळाढवळ केली नाही. म्हणजेच त्यांचे नातेसंबंध केवळ व्यक्तिगत पातळीवर जपले.
मिसेस कौल यांचं निधन झालं, त्यावेळी लोकसभा निवडणुकांसाठी विविध टप्प्यांतील मतदान प्रक्रिया सुरु होती. मोदी वगळता लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज असे भाजपचे ज्येष्ठ नेते अंत्यसंस्कारांना उपस्थित होते.
काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही उपस्थिती लावली होती, तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही फोनवरुन सांत्वन केलं. अशा व्यस्त काळातही काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी अटल बिहारी वाजपेयींची भेट घेतली होती. यातूनच राजकुमारी यांचं वाजपेयींच्या आयुष्यातील स्थान अधोरेखित होतं.