नवी दिल्ली : विकेटकीपर रिद्धीमान साहा दुखापतीमुळे मोहाली कसोटीतून बाहेर झाल्यानंतर पार्थिव पटेलला संधी देण्यात आली आहे. पार्थिव पटेल तब्बल 8 वर्षानंतर कसोटी पुनरागमन करत आहे.


बीसीसीआयच्या या निवडीनंतर रणजी खेळाडू ऋषभ पंत जबरदस्त फॉर्मात असताना त्याऐवजी पार्थिव पटेलला संधी का देण्यात आली, असा सवाल करण्यात आला. त्यावर आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

पार्थिव पटेलचं फलंदाजी आणि कीपिंगमध्ये नेहमीच चांगलं प्रदर्शन राहिलं आहे. त्यामुळेच त्याची निवड करण्यात आली. एक युवा खेळाडू म्हणून ऋषभचं प्रदर्शन चांगलं आहेच. मात्र पार्थिवला त्याच्या अनुभवामुळे निवडण्यात आलं, असं अनिल कुंबळे यांनी सांगितलं.

दरम्यान कसोटीसाठी विकेटकीपर म्हणून रिद्धीमान साहा ही पहिली पसंत असेल, असंही कुंबळे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे स्वाभाविकच पार्थिव पटेलला स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोहाली कसोटी एकमेव संधी असणार आहे.

भारत आणि इंग्लंडमध्ये मोहालीत शनिवारी लढत होणार आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने अगोदरच 1-0 अशी आघाडी घेतली आहे तर एक कसोटी अनिर्णित आहे. त्यामुळे भारत तिसरी कसोटी जिंकून आघाडी घेण्यासाठी उत्सुक असेल.