नवी दिल्ली : पेट्रोल पंप, रुग्णालये, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट या ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत वाढण्याची शक्यता आहे. सरकारकडून याबाबतीत संध्याकाळपर्यंत घोषणा अपेक्षित असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही जीवनावश्यक ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारल्या जात आहेत. 24 नोव्हेंबर म्हणजे नोटा स्वीकारण्याची आज शेवटची तारीख आहे. मात्र गैरसोय होऊ नये, यासाठी सरकारकडून आणखी मुदतावढ देण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर गैरसोय टाळण्यासाठी जीवनावश्यक ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारल्या जात होत्या. मात्र आज या मुदतीच्या शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत वाढण्याची शक्यता आहे.
टोलमाफी आता 1 डिसेंबरपर्यंत
केंद्र सरकारने चौथ्यांदा वाहनचालकांना दिलासा दिला आहे. कारण राष्ट्रीय महामार्गावरील टोलमाफी 1 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे महामार्गांवर टोल भरावा लागणार नाही.
जुन्या नोटांचा तुटवडा, सुट्ट्या पैशांचा खोळंबा असल्याने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आणखी सात दिवस राष्ट्रीय महामार्गांवर टोल भरण्याची गरज नाही.