पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिसला अखेर 2024 सालच्या ऑलिम्पिक यजमानपदाचा मान मिळणार, हे आता निश्चित झालं आहे. तर 2028 चं ऑलिम्पिक अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात होणार आहे.
2024 सालच्या ऑलिम्पिक यजमानपदाच्या शर्यतीत पॅरिस आणि लॉस एंजेलिस ही दोनच शहरं उरली होती. त्यापैकी लॉस एंजेलिसने 2028 सालच्या ऑलिम्पिक यजमानपदाचा प्रस्ताव दिल्याने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनलाही हा तिढा सोडवणं सोपं जाणार आहे.
सप्टेंबर महिन्यात पेरुमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या बैठकीत याबाबत अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.
पॅरिसला याआधी 1995, 2008 आणि 2012 सालच्या ऑलिम्पिक यजमानपदाचा मान मिळवण्यात अपयश आलं होतं. पण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी केलेल्या शिफारशी स्वीकारल्यामुळे, पॅरिसचा ऑलिम्पिक यजमानपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, 2020 सालचं ऑलिम्पिक जपानची राजधानी टोकियोमध्ये होणार आहे.