किंगस्टन : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात हार्दिक पंड्याने स्फोटक फलंदाजी केली. सर्व फलंदाज एकामागोमाग बाद झाल्यानंतर पंड्याने तडाखेबाज खेळी करत भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र तो रवींद्र जाडेजाच्या चुकीमुळे धावबाद झाला.


एवढ्या महत्वपूर्ण सामन्यात चांगली फलंदाजी करत असलेल्या पंड्याच्या विकेटला कारणीभूत ठरलेल्या रवींद्र जाडेजाचा संपूर्ण देशाला राग आला. तसाच राग हार्दिक पंड्यालाही आला होता. मात्र तो राग 3 मिनिटात शांत झाला, असं पंड्याने सांगितलं.

धावण्याचा ताळमेळ हुकल्याने मी बाद झालो. राग आला, पण जास्त नाही तीन मिनिटात मी शांत झालो, असं पंड्याने सांगितलं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या वन डेपूर्वी तो बोलत होता.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत असल्यामुळे वेस्ट इंडिजच्या खेळाडूंशी चांगले संबंध आहेत. वेस्ट इंडिजमध्ये आल्यानंतर सर्वात अगोदर मी कायरन पोलार्डला फोन केला आणि इथल्या खेळपट्टीबाबत विचारलं, असंही पंड्याने सांगितलं.