मध्य प्रदेश : घरची आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने लग्नाचा खर्च शक्य नाही, हे जाणून मध्य प्रदेशातील सिहोरमधील तरुण-तरुणीने अनोख्या पद्धतीने लग्न केलं. खरंतर अत्यंत स्तुत्य असं पाऊल या दोघांनी उचललं.


कल्लू जाटव आणि वैजंती राजोरिया या जोडप्याने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला सात फेऱ्या मारुन लग्न केलं. कोणत्याही खर्चाचा भार या दोघांच्याही कुटुंबियांना झेपणारा नव्हता. त्यामुळे अत्यंत स्तुत्य असं पाऊल उचलत डॉ. आंबेडकर पार्कमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या पुतळ्याला फेऱ्या मारुन हे दोघेही विवाहबंधनात अडकले.

लग्नासाठी मुख्यमंत्री कन्यादान योजनेअंतर्गत आर्थिक मदत मागूनही कोणतीच मदत मिळाली नसल्याचा दावा कल्लू जाटव याने केला आहे. त्यानंतर काही सामाजिक संघटना आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिकांकडे मदत मागितली आणि त्यातून अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करण्याचे ठरवले.

“वर आणि वधू दोघेही आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातून आलेले आहेत. त्यामुळे लग्नासारखा महागडा कार्यक्रम त्यांना कोणत्याही स्थितीत शक्य नाही. ते आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. हे सारं ज्यावेळी आम्हाला कळलं, त्यावेळी या दोघांचंही लग्न साध्या पद्धतीने करुन देण्याचे ठरवले”, असे कल्लू जाटव आणि वैजंती राजोरिया यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र खंगराले यांनी सांगितले.