कराची : पाकिस्तान क्रिकेट संघातून स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदी घातलेला लेग स्पिनर दानिश कनेरिया भारतात आल्यामुळे शंका उपस्थित केली जात आहे. दानिशच्या भावाने मात्र कनेरिया कुटुंबीय काही धार्मिक विधी करण्यासाठी भारतात आल्याचा दावा केला आहे.

 
दानिशसह त्याची आई, पत्नी आणि मुलं रविवारी रात्री भारतात आली. कनेरिया कुटुंबीय सध्या कोचीत असल्याचं म्हटलं जातं. मात्र दानिश कुटुंबासह भारतात स्थायिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

दानिशचा भाऊ विकी कनेरियाने मात्र कुटुंबीय कायमचे भारतात येण्याची शक्यता नाकारली आहे. 'धार्मिक विधींसाठी साधारण 10 दिवसांचा कालावधी लागेल, मात्र तो निश्चित नसल्यामुळे पाकिस्तानात परतण्याची तारीख अद्याप ठरवलेली नाही.' असं विकी कनेरिया म्हणतो. विकी सध्या कराचीत असून तो एका ऑईल कंपनीमध्ये नोकरी करतो.

 
कसोटी क्रिकेटमधील लेग स्पिनर दानिश कनेरियावर बंदी घालण्यात आली होती. मात्र हिंदू असल्यामुळे भारतात न्याय मिळाला असता, असं दानिशने काही महिन्यांपूर्वी म्हटलं होतं. त्यामुळे दानिशच्या भारतभेटीवर शंका उपस्थित केली जात आहे. दानिशने मात्र आपण पाकिस्तान सोडून कुठेही जाणार नसल्याचं ट्विटरवर म्हटलं आहे.

 

https://twitter.com/iDanish_Kaneria/status/737656743530881025

 

 

 

दानिशने पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या असहकाराबद्दल कायमच नाराजीचा सूर आळवला होता. आपण हिंदू नसतो, तर आपली केस वेगळ्या पद्धतीने हाताळली गेली असती, या शब्दात त्याने खदखद व्यक्त केली होती. पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पत्र लिहून दानिशने व्यथा मांडली होती, मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.

 

https://twitter.com/iDanish_Kaneria/status/737657505963089921

 

 
पाकिस्तानसाठी 61 कसोटी सामने खेळलेल्या दानिशवर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी 2012 मध्ये आजन्म बंदी घालण्यात आली होती. बंदी हटवण्यासाठी दोन वेळा दानिशने केलेले अपीलही धुडकावण्यात आले होते.