मुंबई : मैदानात खेळताना जिंकण्याच्या जोशात मोठमोठ्या खेळाडूंकडून ज्युनिअर्सना उद्देशून अवमानकारक भाषा वापरली जाऊ शकते. पाकिस्तान सुपर लीगमध्ये एका सामन्यात खेळताना पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने युवा क्रिकेटपटूला असंच खिजवलं. मात्र याची जाणीव झाल्याने आफ्रिदीने ट्विटरवर त्याची माफी मागितली.


पाकिस्तान सुपर लीगमधल्या एका सामन्यात मुलतान सुलतान कडून खेळणाऱ्या सैफ बदर या युवा क्रिकेटपटूला बोल्ड केल्यावर कराची संघातून खेळणारा आफ्रिदी चेकाळला आणि त्याला खाणा-खुणा करत 'तिकडे जा तिकडे' असं म्हणाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा प्रकार सोशल मीडिया यूझर्सना फारसा आवडला नाही.

सोशल मीडियावर आफ्रिदीची होणारी छि-थू पाहून 'मी अजूनही तुमच्यावर प्रेम करतो शाहीद भाई' असं सैफ बदरने शाहिद आफ्रिदीला टॅग करुन म्हटलं. सैफचा दिलदारपणा पाहून शाहिद भारावला. 'मला माफ कर, जे झालं तो खेळातला एक क्षण होता. मी नेहमी युवा क्रिकेटपटूंच्या पाठीशी असतो. तुला खूप शुभेच्छा' असं ट्वीट आफ्रिदीने केलं.




पीएसएलमधल्या 22 व्या सामन्यात कराची संघाने 188 धावा ठोकल्या होत्या. कराचीने 'मुल्तान सुलतान'चा डाव 125 धावात गुंडाळला. केरन पोलार्ड, शोएब मलिक आणि सैफ बदर आफ्रिदीचे बळी ठरले.