भाजपचा चौथा उमेदवार, विजया रहाटकर राज्यसभेच्या रिंगणात
एबीपी माझा वेब टीम | 12 Mar 2018 02:39 PM (IST)
भाजपने महाराष्ट्राच्या कोट्यातून प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरन यांची नावं जाहीर केली होती. त्यातच सोमवारी विजया रहाटकरांना भाजपने राज्यसभेच्या मैदानात उतरवलं
नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेच्या जागेसाठी भाजपने चौथा उमेदवार दिला आहे. भाजपतर्फे विजया रहाटकर यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीची चुरस वाढली आहे. विजया रहाटकर या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या प्रमुखही आहेत. यापूर्वी त्यांनी औरंगाबादचं महापौरपदही भूषवलं आहे. भाजपने महाराष्ट्राच्या कोट्यातून प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरन यांची नावं जाहीर केली होती. त्यातच सोमवारी विजया रहाटकरांना भाजपने राज्यसभेच्या मैदानात उतरवलं. त्यामुळे अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक अटळ आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेकडून अनिल देसाई, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण, तर काँग्रेसकडून कुमार केतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 13 मार्च रोजी निवडणूक अर्जाची छाननी होणार असून 15 मार्च ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. 16 राज्यातील राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान झाल्यावर त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. एप्रिल महिन्यात राज्यसभेचे 58 खासदार निवृत्त होणार आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 10, तर महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. विधानसभेचे संख्याबळ पाहता, राज्यातील तीन जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जातो. प्रकाश जावडेकर हे विद्यमान केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री असून ते सध्या मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर गेले आहेत. त्यामुळे आता ते होम ग्राऊंडवरुन म्हणजे महाराष्ट्रातून राज्यसभेत जातील. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करुन एनडीएत सहभाग घेतला. मात्र राज्यातील मंत्रिपदाच्या आशेवर असणारे राणे आता राज्यसभेच्या दिशेने कूच करत आहेत. एकनाथ खडसे आरोपांच्या जंजाळात अडकल्यापासून मंत्रिमंडळापासून दूर आहेत. त्यामुळे त्यांना दिल्लीत नेण्याच्या पक्षाच्या हालचाली होत्या, मात्र खडसे त्यासाठी अनुत्सुक होते. सचिन तेंडुलकर, रेखा, अनु आगा या तिघांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती नियुक्त तीन नवे खासदार कोण असणार याचीही उत्सुकता आहे. महाराष्ट्रातून निवृत्त होणारे खासदार वंदना हेमंत चव्हाण - राष्ट्रवादी डी. पी. त्रिपाठी - राष्ट्रवादी रजनी पाटील - काँग्रेस अनिल देसाई - शिवसेना राजीव शुक्ला - काँग्रेस अजयकुमार संचेती - भाजप कोणत्या पक्षाचे किती खासदार निवृत्त? भाजप -17 काँग्रेस - 12 समाजवादी पक्ष - 6 जदयू - 3 तृणमूल कॉंग्रेस - 3 तेलुगू देसम पक्ष - 2 राष्ट्रवादी कॉंग्रेस - 2 बीजद - 2 बसप - 1 शिवसेना - 1 माकप - 1 अपक्ष - 1 राष्ट्रपती नियुक्त - 3 कोणत्या राज्यातील किती जागा? आंध्र प्रदेश - 3 बिहार - 6 छत्तीसगड - 1 गुजरात - 4 हरियाणा - 1 हिमाचल प्रदेश - 1 कर्नाटक - 4 मध्य प्रदेश - 5 महाराष्ट्र - 6 तेलंगणा - 3 उत्तर प्रदेश - 10 उत्तराखंड - 1 पश्चिम बंगाल - 5 ओदिशा - 3 राजस्थान - 3 झारखंड - 2