मुंबई : वाघा बॉर्डरवर चक्क पाकिस्तानी क्रिकेटपटूने पाकिस्तानी सैन्यासोबत विचित्र परेड करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे भारतीय जवानांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून निषेधाचा सूर उमटत आहे.

वाघा बॉर्डरवर शनिवारी संध्याकाळी फ्लॅग मार्च सुरु असताना पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली थेट पाकिस्तानच्या सैन्यात घुसला आणि त्याने विचित्र पद्धतीने परेड करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार होत असताना पाकिस्तानच्या एकाही जवानाने हसनला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.

प्रोटोकॉलनुसार अशा फ्लॅग मार्च सोहळ्यात फक्त लष्कराच्या जवानांनाच सहभागी होता येतं. परेड सुरु असताना प्रेक्षक गॅलरीतून सामान्य नागरिक आपल्या भावना व्यक्त करु शकतात. तसंच परेड सुरु होण्यापूर्वी किंवा संपल्यानंतर त्यांना अशाप्रकारचं कृत्य करता येऊ शकतं, मात्र परेड सुरु असताना हस्तक्षेप कसं करु दिलं, असा सवाल भारतीय जवानांनी विचारला आहे.


पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार सर्फराझ अहमदसोबत काही खेळाडू वाघा बॉर्डरवर आले होते. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी संघाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी हा दौरा आखण्यात आला होता.