कराची : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा फलंदाज अहमद शहजाद डोप टेस्टमध्ये फेल झाला आहे. याप्रकरणी शहजादविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून शहजादवर निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.


पीसीबीच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या घरगुती टुर्नामेंट दरम्यान शहजादची डोप टेस्ट करण्यात आली होती. या डोप टेस्टमध्ये तो पॉजिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे 26 वर्षीय अहमद शहजादची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारकीर्द धोक्यात आली आहे.


गेल्या महिन्यात पीसीबीने कोणाचंही नाव न घेता एक खेळाडू डोप टेस्टमध्ये फेल झाल्याचं जाहीर केलं होतं. आयसीसीच्या नियमानुसार, सरकारच्या अँटी डोपिंग एजन्सीकडून स्पष्टीकरण येत नाही, तोपर्यंत त्या खेळाडूचं नाव जाहीर करता येणार नसल्याचं पीसीबीनं म्हटलं होतं.


पाकिस्तानच्या मोठ्या आणि महत्त्वाच्या खेळाडूचा समावेश असल्याने पाकिस्तानची अँटी डोपिंग एजन्सी पुन्हा एकदा तपासणी करणार आहे. यासाठी भारतातील प्रयोगशाळेत नमुन्यांची पुन्हा नव्याने तपासणी केली जाणार आहे. डोप टेस्टमध्ये फेल झाल्यामुळे अहमद शहजादवर एका वर्षाच्या बंदीची कारवाईची शक्यता असल्याचं क्रिकेट तज्ज्ञांनी म्हटलं आहे.


डोपिंग आणि पाकिस्तानी खेळाडूंचं जुनं नातं
याआधीही पाकिस्तानचे खेळाडू डोपिंगमध्ये अडकले आहेत. वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि मोहम्मद आसिफ 2006 मध्ये डोपिंग प्रकरणात दोषी आढळले होते. पाकिस्तानचा फिरकीपटू रजा हसन 2015 याप्रकरणात दोषी आढळला होता. तर काही महिन्यापूर्वी फिरकीपटू यासिर शाह आणि अब्दुर रहमान डोपिंगमध्ये दोषी आढळले होते.