भारतासोबत क्रिकेटविषयी कसलीही तडजोड नको, पाक सरकारचे पीसीबीला निर्देश
एबीपी माझा वेब टीम | 29 May 2016 02:35 PM (IST)
कराचीः भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना पुन्हा एकदा ग्रहण लागलं आहे. पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयसोबत सामने खेळवण्यासाठी कसलीही तडजोड करण्यास सक्त मनाई केली आहे. नवाज शरीफ सरकारचं म्हणणं आहे की, हा मुद्दा पीसीबीचा नसून राजकीय मुद्दा आहे, त्यामुळे सरकार पुढील निर्देश देत नाही तोपर्यंत पीसीबी बीसीसीआयसोबत कसलीही बातचीत करणार नाही. सरकारच्या पुढील निर्णयाची पीसीबीला प्रतीक्षा आहे, अशी माहिती पीसीबीचे चेअरमन शयरयार खान यांनी दिली. यामुळेच आयसीसीच्या बैठकीतही चर्चा टाळली आयसीसीच्या बैठकीत काही दिवसांपूर्वी पीसीबीने बीसीसीआयसोबत चर्चा न केल्याचा विषय गाजला होता. मात्र सरकारच्या या निर्णयामुळेच बीसीसीआयसोबत बोलणं शक्य झालं नाही, असं खान यांनी सांगितलं दरम्यान खान यांनी अनुराग ठाकूर यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड ही भारत पाकिस्तान क्रिकेट संबंधांसाठी सकारात्मक असल्याचं सांगितलं. ठाकूर आणि मी दोघेही सरकारचे प्रतिनिधी असून लवकरच या मुद्द्यावर सरकारशी बोलू असंही त्यांनी सांगितलं.