पोझॅल्लो(इटली) : निर्वासितांच्या समस्येचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दक्षिण इटलीत वेगवेगळ्या तीन दुर्घटनांमध्ये 700 पेक्षा जास्त निर्वासितांचा स्थलांतर करताना समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे.
निर्वासित बेकायदेशीरपणे बोटींची तस्करी करुन युरोपमध्ये स्थायिक होण्यासाठी जात होते. मात्र, गेल्या काही दिवसात समुद्राच्या मध्यात तीन बोटी बुडून 700 पेक्षा जास्त निर्वासितांचा मृत्यू झाला आहे, असं संयुक्त राष्ट्राच्या निर्वासित संस्थेने सांगितले.
यामुळे घडली दुर्घटना
निर्वासित बोटींची तस्करी करुन युरोपमध्ये स्थायिक होण्यासाठी निघाले होते. तस्करी केलेल्या बोटीची केवळ 670 प्रवासी वाहण्याची क्षमता आहे. मात्र, एका बोटीवर क्षमतेपेक्षा जास्त निर्वासितांनी प्रवास केल्यामुळे ही दुर्घटना घडली, असं संयुक्त राष्ट्र निर्वासित संस्थेच्या प्रवक्ता कार्लोट्टा सॅमी यांनी सांगितलं.
शेकडो निर्वासितांचे मृतदेह बेपत्ता
नुकत्याच झालेल्या एका दुर्घटनेत 135 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यापैकी 45 जणांचे मृतदेह शोधण्यात इटालियन नेव्हीला यश आलं आहे. बोटीची तस्करी करणाऱ्यांपैकी देखील अनेक निर्वासितांचा अजून पत्ता लागलेला नाही, मात्र निर्वासित संस्था सर्व मृतदेहांचा शोध लावण्यासाठी इटालियन नेव्हीच्या साहाय्याने युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे, असं सॅमी यांनी सांगितलं.