नवी दिल्ली : भारताची पैलवान विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिला 50 किलो पेक्षा वजन जास्त असल्यानं ऑलिम्पिकमधून निलंबित करण्यात आलं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या विनेश फोगाट हिचं वजन 50 किलो 100 ग्रॅम असल्याचं चाचणीत समोर आलं. विनेश फोगाटला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आल्याची बातमी येताच भारतीयांना मोठा धक्का बसला. या प्रकरणावर क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी लोकसभेत निवेदन केलं आहे.

  


 मनसुख मांडवीय यांनी लोकसभेत बोलताना म्हटलं की, भारताची पैलवान विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर झाल्याबद्दल माहिती देत आहे. विनेश फोगाट  ही 50 किलो वजनी गटात खेळत होती. निश्चित वजनापेक्षा 100 ग्रॅम वजन जास्त भरलं. विनेश  50 किलो वजनी गटात खेळत होती. स्पर्धेसाठी तिचं वजन  50 किलो असणं आवश्यक होतं. UWW च्या नियमांनुसार सर्व स्पर्धकांसाठी , दररोज सकाळी वजन मोजलं जातं. नियम 11 नुसार एखाद्या खेळाडूनं पहिल्या किंवा दुसऱ्या चाचणीत भाग न घेतल्यास किंवा अयशस्वी ठरल्यास त्याला स्पर्धेतून बाहेर काढलं जातं किंवा कोणतंही कारण न देता शेवटच्या स्थानी ठेवलं जातं. 


मांडवीय पुढं म्हणाले, 7 ऑगस्ट 2024 रोजी 50 किलो वजनी गटातील स्पर्धकांच्या वजनाची मोजणी करण्यासाठी 7.15 मिनिट आणि 7.30 वाजता पॅरिसमधील वेळेनुसार ठेवण्यात आलं. विनेश फोगाटचं वजन 50 किलो 100 ग्रॅम आढळून आलं त्यामुळं तिला स्पर्धेसाठी अपात्र ठरवण्यात आलं.  या प्रकरणात भारतीय ऑलिम्पिक संघानं आंतरराष्ट्रीय कुस्ती संघासमोर निषेध दर्शवला आहे. भारतीय ऑलिम्पिक संघाची अध्यक्ष पी टी उषा सध्या पॅरिसमध्ये आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी चर्चा करुन योग्य कार्यवाही करण्यासाठी सूचना केली होती, अशी माहिती देखील मांडवीय यांनी दिली. 


विनेश फोगाटनं 6 ऑगस्टला तीन सामन्यात विजय मिळवत 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय पैलवान ठरली होती. विनेश फोगाटनं वाय. गुझमान लोपेझ, उपांत्यपूर्व फेरी ओकसाना लिवाज आणि पात्रता फेरीत जपानच्या यूई सुसाकीला पराभूत केलं होतं. बुधवारी रात्री 7 वाजता विनेश फोगाटला अमेरिकेची पैलवान सारा ॲन हिल्डब्रँड हिच्यासोबत अंतिम फेरीत सामना करायचा होता, असं मांडवीय यांनी सांगितलं. 


भारत सरकारनं मनसुख मांडवीयला मदत केली : मांडवीय


भारत सरकारनं विनेश फोगटला तिच्या आवश्यकतेनुसार सर्व ती मदत केली आहे. विनेश फोगटसाठी वैयक्तिक स्टाफ नियुक्त करण्यात आला आहे. हंगेरीचा कोच आणि फिजीओ अश्विनी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली, असं मनसुख मांडवीय म्हणाले. 


ऑलिम्पिकसाठी अतिरिक्त स्टाफ नियुक्तीसाठी वित्तीय मदत करण्यात आली, असं मनसुख मांडवीय यांनी माहिती दिली.  ऑलिम्पिकसाठी  70 लाखांची मदत करण्यात आली. स्पेन आणि फ्रान्समध्ये तयारीसाठी, हंगेरीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली, असं मनसुख मांडवीय म्हणाले.  विनेश फोगटला  2022 ला मदत करण्यात आली होती, असंही मांडवीय म्हणाले. टोक्यो ऑलिम्पिक मध्ये देखील मदत करण्यात आल्याची माहिती मांडवीय यांनी संसदेत दिली. 


संबंधित बातम्या :


Vinesh Phogat : पंजाबचे मुख्यमंत्री विनेश फोगाटच्या घरी जाणार, कुटुंबीयांची भेट घेणार


विनेश फोगाट ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरताच ब्रिजभूषण सिंहांचा मुलगा संसदेतून घाईघाईने बाहेर पडला, कॅमेऱ्यांनी घेरताच म्हणाला...