नवी दिल्ली: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला हातातोंडाशी आलेले पहिले सुवर्णपदक हिरावले गेले आहे. या स्पर्धेच्या 50 किलो फ्रीस्टाइल गटात भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिने भल्याभल्यांना अस्मान दाखवत अंतिम फेरीत धडक मारली होती. ती सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर असतानाच वजन जास्त भरल्यामुळे विनेश फोगाटला ऑलिम्पिक स्पर्धेत (Paris Olympics 2024) अपात्र ठरवल्याची माहिती समोर आल्याने भारतीय क्रीडाप्रेमींची आनंदावर विरजण पडले आहे. विनेश फोगाट स्पर्धेत अपात्र ठरल्यामुळे भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला मोठा धक्का लागला आहे. त्यामुळे आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) रिंगणात उतरले आहेत.


या सगळ्या घडामोडींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता या प्रकरणाची सूत्रे हातात घेतली आहेत. काहीवेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. मोदींनी पीटी उषा यांच्याकडून नेमकं काय घडलं, याची माहिती घेतली.  विनेशच्या अपात्रतेनंतर भारताकडे कोणते पर्याय आहेत याबद्दल प्राथमिक माहिती पंतप्रधान मोदी यांनी घेतली. मोदींनी पी टी उषा यांना विनेशच्या केसमध्ये मदत करण्यासाठी सर्व पर्यायांचा शोध घेण्यास सांगितले.विनेशला मदत होणार असेल तर तिच्या अपात्रतेबद्दल तीव्र निषेध नोंदवावा, असेही मोदींनी पीटी उषा यांना सांगितले आहे. त्यामुळे आता पुढील काही तासांमध्ये काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 


भारताने विनेश फोगाटच्या अपात्रतेच्या निर्णयाविरोधात ऑलिम्पिक समितीकडे दाद मागितली आहे. त्यादृष्टीने आता तांत्रिक आणि कायदेशीर पर्याय तपासले जात असून पुढील काही तास महत्त्वाचे असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, या सगळ्या घटनाक्रमानंतर विनेश फोगाट हिची प्रकृती बिघडली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वजन कमी राहण्यासाठी विनेशने खाण्याचे आणि पाणी पिण्याचे प्रमाण कमी केले होते. त्यामुळे विनेशच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले असून तिला त्रास जाणवू लागल्याची प्राथमिक माहिती आहे.


पंतप्रधान मोदींकडून विनेश फोगाटचं सांत्वन


विनेश फोगाटला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करुन तिचे सांत्वन केले. या ट्विटमध्ये तिने म्हटले आहे की, तू चॅम्पियन्सची चॅम्पियन आहेस!तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्थान आहेस.  आज सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मला माहिती आहे की, आव्हान स्वीकारणे हा तुझा स्वभाव आहे. तू  खंबीरपणे कमबॅक करशील असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.


आणखी वाचा


पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी कठोर डाएट, 59 किलोवरुन 50 किलोपर्यंत वजन घटवलं, पण अखेर काही ग्रॅम वजनाने विनेश फोगटचा घात केलाच