Tokyo Olympics 2020 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये आजच्या दिवसाची भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय धावपटू दुती चंदचं ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. दुती 200 मीटर हीट 4 प्रकारात  सातव्या क्रमांकावर राहिली. यामुळं दुतीच्या सेमिफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. तिनं हीट 4मध्ये 23.85 सेकंद एवढा वेळ घेतला. दुतीचा या प्रकारात व्यक्तिगत बेस्ट 23.00 सेकंदांचा आहे.


दुतीने 23.85 च्या हंगामातील सर्वोत्तम वेळेसह 200 मीटर अंतर पार केले खरे पण ती सातव्या स्थानावर राहिली. यामुळं ती उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्यात अयशस्वी झाली. क्रिस्टीन एमबोमाने 22.11 वेळेसह हीट 4मध्ये अव्वल स्थान मिळवले तर अमेरिकेची गॅब्रिएल थॉमस 22.20 च्या वेळेसह दुसऱ्या स्थानावर राहिली. दुती चंद महिलांच्या 100 मीटर स्पर्धेच्या उपांत्य फेरी गाठण्यातही अपयशी ठरली होती. हिट 5 मध्ये दुतीनं 11.54 सेकंदांचा वेळ घेतला होता. ती या प्रकारात 7 व्या स्थानावर होती. 


कमलप्रीत कौरकडे भारतीयांचं लक्ष 


काल पीव्ही सिंधूनं बॅडमिंटनमध्ये कांस्य पदकावर नाव कोरत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. सिंधूपाठोपाठ भारताच्या पुरुष हॉकी संघानंही उपांत्य फेरीत धडक दिली आहे. आज म्हणजेच, सोमवारी भारतीय महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकून पदक मिळवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करतील. याशिवाय कमलप्रीत कौर महिला थाळी फेकच्या अंतिम फेरीत खेळणार आहे. कमलप्रीत कौरकडे भारतीयांचं लक्ष लागलं असून तिला पदकाची प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

आजचं वेळापत्रक


थाळी फेक फायनल


सायंकाळी 4:30 वाजता : कमलप्रीत कौर, महिलांची थाळी फेक फायनल


घोडेस्वारी


दुपारी 1:30 वाजता : फवाद मिर्झा, इव्हेंटिंग जंपिंग वैयक्तिक पात्रता
सायंकाळी 5:15 वाजता : वैयक्तिक जम्पिंग फायनल


हॉकी


सकाळी 8:30 वाजता : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, महिला हॉकी, उपांत्यपूर्व फेरी


नेमबाजी


सकाळी 8 वाजता : संजीव राजपूत आणि ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, पुरुषांची 50 मीटर रायफल थ्री पोझिशन क्वालिफिकेशन 
दुपारी 1:20 वाजत : पुरुषांची 50 मीटर रायफल थ्री पोझिशन फायनल