Tokyo Olympics 2020 : स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी मीराबाई चानूनं रौप्य पदकावर आपलं नाव कोरत देशाच्या शिरपेचात मााचा तुरा रोवला. मीराबाई चानूनं टोकियो ऑलिम्पिकमधील आपलं रौप्य पदक देशवासियांना समर्पित केलं आहे. 


मीराबाई चानूने ट्विटरवर व्हिडीओ अपलोड करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. मीराबाई चानूनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं म्हटलंय की, "काल मी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक जिंकलं. सर्व भारतीयांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. मी माझं पहिलं पदक देशवासियांना समर्पित करतेय"



मीराबाई चानूनं आपल्या यशाचं सर्व श्रेय देशवासियांना दिलं. मीराबाई चानूनं पुढे बोलताना म्हटलं की, "सर्व देशवासियांमुळे मी टोकियो ऑलिम्पिकमध्ये एवढं मोठ यश मिळवू शकले. मी सर्वांचे आभार मानते"


ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक, मीराबाई चानूनं जिंकलं रौप्यपदक


टोकियो इथं सुरु असलेल्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं आहे. मीराबाई चानूनं दिलं भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजन गटात तिनं रौप्यपदक  मिळवलं आहे. मीराबाई चानूनं शानदार प्रदर्शन करत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात 87 किलो वजन उचललं तर  क्लीन अॅंड जर्कमध्ये मीराबाई चानूनं 115 किलो वजन उचलत पदकावर शिक्कामोर्तब केलं. मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात दुसरं पदक मिळवून दिलं आहे. भारताकडून वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू आहे.


पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती कोविंद यांच्यासह दिग्गजांकडून मीराबाईवर कौतुकाचा वर्षाव


वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजनगटात चीनच्या जजिहूला सुवर्णपदक मिळालं आहे. मीराबाईनं भारताला मिळवून दिलेल्या पहिल्या पदकानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह दिग्गज नेत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान मोदींनी मीराबाईसोबतचा एक फोटो ट्वीट केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये यापेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही. अवघा भारत मीराबाईच्या कामगिरीनं आनंदी आहे.  भारोत्तोलनमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचं अभिनंदन. तिचं यश प्रत्येक भारतीयांना प्रेरीत करेल, असं मोदी यांनी म्हटलं आहे.