Olympic Full Schedule 2 August : टोकियो ऑलिम्पिकचा दहावा दिवस भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरला. कारण पीव्ही सिंधूनं बॅडमिंटनमध्ये कांस्य पदकावर नाव कोरत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. सिंधूपाठोपाठ भारताच्या पुरुष हॉकी संघानंही उपांत्य फेरीत धडक दिली आहे. आज म्हणजेच, सोमवारी भारतीय महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकून पदक मिळवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करतील. याशिवाय कमलप्रीत कौर महिला थाळी फेकच्या अंतिम फेरीत खेळणार आहे. कमलप्रीत कौरकडे भारतीयांचं लक्ष लागलं असून तिला पदकाची प्रबळ दावेदार मानलं जात आहे. आज (सोमवारी) टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचं संपूर्ण वेळापत्रक काय, ते जाणून घेऊयात...
अॅथलेटिक्स
सकाळी 7:25 वाजता : दुती चंद, महिलांची 200 मीटर हीट फोर
सायंकाळी 4:30 वाजता : कमलप्रीत कौर, महिलांची थाळी फेक फायनल
घोडेस्वारी
दुपारी 1:30 वाजता : फवाद मिर्झा, इव्हेंटिंग जंपिंग वैयक्तिक पात्रता
सायंकाळी 5:15 वाजता : वैयक्तिक जम्पिंग फायनल
हॉकी
सकाळी 8:30 वाजता : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, महिला हॉकी, उपांत्यपूर्व फेरी
नेमबाजी
सकाळी 8 वाजता : संजीव राजपूत आणि ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, पुरुषांची 50 मीटर रायफल थ्री पोझिशन क्वालिफिकेशन
दुपारी 1:20 वाजत : पुरुषांची 50 मीटर रायफल थ्री पोझिशन फायनल
भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये कालचा (रविवार) दिवस कसा होता?
बॅडमिंटन : पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. सिंधूने रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत चीनच्या खेळाडूचा पराभव करुन ही कामगिरी केली. पी व्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. या ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे पदक आहे.
पीव्ही सिंधूने कांस्य पदकासाठीच्या सामन्यात चीनच्या बिंग जियाओचा पराभव केला. सिंधूच्या या कामगिरीमुळे संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली आहे. सिंधूने सुरुवातीपासूनच या सामन्यावर वर्चस्व राखले आणि पहिल्या गेममध्ये चीनच्या खेळाडूचा 21-13 असा पराभव करून तिची पकड मजबूत केली. यानंतरही तिने चमकदार कामगिरी करत पदक आपल्या नावावर केले. त्यानंतर, तिने दुसऱ्या गेममध्येही चमकदार कामगिरी केली आणि पदक जिंकले. 52 मिनिटे चाललेल्या सामन्यात सिंधूने चिनी खेळाडू बिंगचा 21-13, 21-15 असा पराभव केला.
हॉकी : भारतीय पुरुष संघाने ग्रेट ब्रिटनचा 3-1 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
बॉक्सिंग : सतीश कुमार (+91 किलो) विश्वविजेता बाखोदिर जलोलोव (उझबेकिस्तान) कडून 0-5 ने पराभूत झाल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडला.
गोल्फ : पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत अनिर्बन लाहिरीने संयुक्तपणे 42 वे आणि उदयन मानेने 56 वे स्थान मिळवले.