Tokyo Olympic : टोकियो ऑलिम्पिकचा दुसरा दिवस भारतासाठी 'रुपेरी' ठरला. सैखोम मीराबाई चानू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी पहिले रौप्यपदक जिंकले आहे. मीराबाई चानूने 49 किलोग्राम महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. तिसर्या दिवशी भारतीय खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा आहे. महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये मनु भाकर सकाळी 5.30 वाजता पदक जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. आतापर्यंत वर्ल्ड कपच्या शूटिंगमध्ये 9 सुवर्ण पदके जिंकणार्या मनु भाकरने राष्ट्रकुल क्रीडा तसेच युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदके जिंकली आहेत.
यशस्विनी सिंह देसवाल देखील याच स्पर्धेत मैदानात उतरेल. यशस्विनीने आतापर्यंत विश्वचषकात 2 सुवर्णपदके जिंकली आहेत. दिव्यांश पवार व दीपक कुमार रविवारी सकाळी पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफलमध्ये पदक जिंकण्यासाठी उतरतील. दिव्यांश 18 वर्षाचा आणि देशातील सर्वात तरुण शूटर आहे.
भारताची स्टार बॉक्सर मेरी कोम रविवारी सकाळी महिला बॉक्सिंग फ्लायवेट स्पर्धेच्या पहिल्या फेरीत रिंगमध्ये उतरेल. पीव्ही सिंधू देखील ग्रुप लीगचा पहिला सामना खेळण्यासाठी कोर्टमध्ये दिसेल.
Mirabai Chanu Wins Medal: टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू कोण आहे?
हॉकी गटातील लीग सामन्यात न्यूझीलंडला 3-2 ने पराभव करुन भारतीय खेळाडू रविवारी ऑस्ट्रेलियाविरूद्ध मैदानात उतरतील. भारतीय महिला आणि पुरुष टेबल टेनिसपटू रविवारी दुसर्या फेरीतील सामन्यांमध्ये खेळतील.
महिला टेनिसमध्ये सानिया मिर्झा आणि अंकिता रैना पहिल्या फेरीच्या सामन्यात खेळण्यासाठी कोर्टवर असतील. तर जिम्नॅस्टिक्समधील प्रणती नायक आणि स्विमिंगमधील सज्जन प्रकाश आणि श्रीहरी नटराज टोकियोमध्ये पदकासाठी खेळताना दिसतील.