नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सलग तीन पराभवाचा सामना केल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास केला. ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने हा टप्पा गाठण्याची ही पहिलीच वेळ होती. महिला संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाकडून 2-1 ने पराभूत झाल्यानंतर कांस्यपदकाचा प्लेऑफ सामनाही गमावला. त्यानंतर संघाचे प्रशिक्षक शोरेड मरिन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.


प्रशिक्षक शोरेड मरिन यांचा राजीनामा
भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक शोरेड मरिन म्हणतात की, संघासोबत त्यांची जबाबदारी केवळ ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक प्लेऑफ सामन्यापर्यंत होती. त्याचबरोबर देशभरातील महिला हॉकी संघाची कामगिरी पाहून सर्व प्रशिक्षक शोरेड मरिनच्या प्रशिक्षणाचे कौतुक करत आहेत. त्यांच्या कठोर प्रशिक्षणाचा हा परिणाम आहे की, भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या संघाला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.




प्रशिक्षक शोरेड मरिन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले की, 'आम्ही पदक जिंकले नाही, पण मला वाटते की आम्ही काहीतरी मोठे जिंकले आहे. आम्ही भारतीयांना पुन्हा अभिमानास्पद बनवले आहे आणि लाखो मुलींना प्रेरणा दिली आहे की स्वप्ने सत्यात उतरू शकतात, जोपर्यंत तुम्ही त्यासाठी कठोर परिश्रम करता आणि त्यावर विश्वास ठेवता. आपल्या सहकार्याबद्दल आपले आभार.'


जानेका शॉपमनला जबाबदारी मिळणार
भारतीय महिला हॉकी संघ टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक लढतीत ग्रेट ब्रिटनकडून 4-3 ने पराभूत झाला. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक शोरेड मरिन यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली तसेच ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले की, भारतीय महिला हॉकी संघाशी हा त्यांचा शेवटचा सामना होता. यानंतर त्यांची अद्याप कोणतीही योजना नाही. आता संघाची जबाबदारी भारतीय महिला हॉकी संघाचे विश्लेषणात्मक प्रशिक्षक जानेका शॉपमन यांची असेल.


असे सांगितले जात आहे की भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) ने त्यांच्या वतीने भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक शोएर्ड मरिन आणि विश्लेषणात्मक प्रशिक्षक जानेका शॉपमन यांना त्यांचा कार्यकाळ वाढवण्याची ऑफर दिली होती. त्याचवेळी, मुख्य प्रशिक्षक मरिन यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे ही ऑफर नाकारली आहे.