मुंबई: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 50 किलो फ्रीस्टाइल गटात धडाकेबाज कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारणारी भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिला अपात्र ठरवण्यात आले आहे. विनेश फोगाट हिचे वजन जास्त भरल्यामुळे शेवटच्या क्षणी विनेश फोगाटला (Vinesh Phogat) ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. संपूर्ण भारत विनेश फोगाट कुस्तीत सुवर्णपदक मिळवेल, याकडे डोळे लावून बसला होता. मात्र, विनेश फोगाटचे वजन काही ग्रॅम जास्त भरल्याने तिला स्पर्धेतून बाद करण्यात आले आहे.


या स्पर्धेपूर्वी काही महिने आधी दिल्लीतील जंतरमंतर येथे कुस्ती फेडरेशनचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत देशातील कुस्तीपटूंनी आंदोलन केले होते. विनेश फोगट हीदेखील या आंदोलनाचा भाग होती. कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह हे सत्ताधारी भाजपचे उत्तर प्रदेशातील बाहुबली नेते आहेत. अनेक दिवस दिल्लीत त्यांच्याविरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु होते. या सगळ्या आंदोलनामुळे विनेश फोगाटचे ऑलिम्पिकसाठीच्या तयारसाठीचे सहा महिने वाया गेले होते. मात्र, त्यानंतर उरलेल्या सहा महिन्यांत विनेश फोगाटने ऑलिम्पिक स्पर्धेची कसून तयारी केली होती. तिने 50 किलो वजनी गटात खेळण्यासाठी कठोर डाएट करुन आपले वजन झटपट कमी केले होते. 




विनेशने 59 किलोवरुन 50 किलोपर्यंत वजन घटवलं


विनेश फोगाट यापूर्वी वेगळ्या वजनी गटात खेळायची. त्यावेळी तिचे वजन साधारण 56 किलो इतके होते. मध्यंतरी विनेश फोगाटला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, तरीही विनेश फोगाटने नेटाने ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी सुरु ठेवली होती. तिने ऑलिम्पिकसाठी पात्रता स्पर्धेत दोन वेगवेगळ्या वजनी गटातून खेळण्याचा निर्णय घेतला होता. यावरुन बराच वादंगही झाला होता. पात्रता फेरीचे सामने सुरु असताना विनेश फोगट दिल्लीत आंदोलन करत होती. मात्र, सकाळी आंदोलन करुन पात्रता फेरीत भाग घेऊन विनेश फोगाट विजयीही झाली होती.


गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात विनेशची लिगामेंट सर्जरी झाली होती. या काळात विनेशचे वजन 59 किलोपर्यंत वाढले होते. मात्र, त्यानंतर विनेशने कठोर डाएट करुन आपले वजन 50 किलोपर्यंत कमी केले होते. यासाठी तिने अन्नपाण्याचे प्रमाण कमी केले होते. त्यावेळी डॉक्टरांनी विनेशला तसे करु नकोस, असे सांगितले होते. कारण अशाप्रकारे वजन कमी केल्यास विनेशला अशक्तपणा किंवा दुखापत होण्याची शक्यता होती. मात्र, विनेशला काही करुन भारताला 50 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून द्यायचे होते. त्यामुळे विनेशने कठोर डाएट करुन आपले वजन 50 किलोपर्यंत खाली आणले होते. मात्र, आता अंतिम सामन्याला काही तास बाकी असताना विनेश फोगाटचे वजन तब्बल 100 ग्रॅम जास्त भरल्याची माहिती आहे. त्यामुळे विनेश फोगाटला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे.


भारत ऑलिम्पिक समितीकडे दाद मागणार


विनेश फोगाट हिला स्पर्धेतून अपात्र ठरवल्याच्या निर्णयाविरोधात भारताकडून दाद मागितली जाणार आहे. त्यामुळे पुढील काही तास विनेश फोगाटच्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. विनेशच्या लिक्विड डाएटमध्ये काहीतरी गोंधळ झाल्याने ऐनवेळी तिचे वजन जास्त भरल्याचे सांगितले जात आहे. 


आणखी वाचा


विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र; भारताला मोठा धक्का, एका रात्रीत काय घडलं?