PM Modi Spoke To Manu Bhaker Paris Olympics 2024: पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत (Paris Olympics 2024) भारताच्या मनू भाकरने (Manu Bhaker) महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिलं कांस्यपदक मिळालं आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे. मनू भाकरने कांस्य पदक जिंकल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्विट करत अभिनंदन केलं होतं. यानंतर मनू भाकरला थेट फोन करत तिच्याशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी फोनवर काय म्हणाले?
नमस्कार… मनू, तुझे खूप खूप अभिनंदन...तुमच्या यशाची बातमी ऐकून मला बरे वाटते. तुम्ही संपूर्ण देशाला गौरव मिळवून दिला. देशासाठी पदक आणणाऱ्या तुम्ही पहिल्या महिला आहेत. मला खात्री आहे की, तुम्ही भविष्यात खूप चांगली कामगिरी कराल. बाकी सगळे मित्र तिथे ठीक आहेत का? यावर मनू भाकर म्हणाली, सर्व काही ठीक आहे. नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, आम्ही तिथं असलेल्या आमच्या खेळाडूंना क्रीडा दृष्टिकोनातून पूर्ण व्यवस्था मिळावी यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. मनू म्हणाली, या बाबतीत तुमचे सर्व प्रयत्न यशस्वी झाले. यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, तुम्ही घरच्यांसोबत बोललात की नाही? यावर उत्तर देताना मनू म्हणाली, नाही सर, अजून बोलणं झालेलं नाही. संध्याकाळी रूमवर गेल्यावर त्यांच्याशी बोलेन, यानंतर नरेंद्र मोदींनी पुन्हा आभिनंदन करत फोन ठेवला.
फायनलमध्ये मनू भाकरचा स्कोर
पहिली 5 शॉट सीरीज: 10.6, 10.2, 9.5, 10.5, 9.6, एकूण 50.4
दुसरी 5 शॉट मालिका: 10.1, 10.3, 9.6, 9.6, 10.3, एकूण: 49.9
उर्वरित शॉट्स: 10.5, 10.4, 9.8, 9.8, 9.9, 10.2, 10.1, 10.2, 10.1, 10.0, 10.1,10.3
कोण आहे मनू भाकर?
22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे. जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं.