चंदीगड : हाताला झालेली दुखापत ते आता हातात असलेले गोल्ड मेडल हा प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, माझे हे गोल्ड मेडल संघर्ष करत असलेल्यांसाठी आशेचा किरण ठरु शकेल अशा प्रकारचा भावनिक संदेश नीरज चोप्राने दिला आहे. नीरज चोप्राने आपल्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट केली असून त्यामध्ये ही भावना व्यक्त केली आहे. 


नीरज चोप्राने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "मे 2019 ते आजपर्यंत, एल्बोची दुखापत ते हाती गोल्ड मेडल असेपर्यंत, हा प्रवास बराच मोठा आहे. मी डॉ. दिनशॉ पार्डिवाला, माझे प्रशिक्षक आणि फिजियो प्रशिक्षक, जे गेली दोन वर्षांपासून माझ्यासोबत आहेत, त्यांचं मी आभार मानतो. माझ्या या मेडलमुळे जे लोक त्यांच्या आयुष्यातील वाईट काळाला सामोरं जात आहेत, त्यांना पुढे कुठेतरी आशेचा किरण असल्याची प्रेरणा देईल अशी आशा आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा, जय हिंद!" 


 




मे 2019 मध्ये निरज चोप्रा हा आपल्या एल्बोच्या दुखापतीने त्रस्त होता. त्यावेळी त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि बरेच दिवस त्याला विश्रांती घ्यावी लागली होती. त्या दुखापतीतून बाहेर येऊन त्याने फिनिक्स प्रमाणे भरारी मारली आणि थेट ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकून इतिहास घडवला. 


नीरजने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यापूर्वी त्याच्या इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या 10 लाख इतकी होती. आता त्यात वाढ होऊन ती 36 लाखाहून अधिक झाली आहे. याशिवाय जवळपास 40 लाख लोकांनी त्याचा पदकासह पोस्ट केलेले फोटो लाईक केला आहेत आणि हजारो लोकांनी कमेंट करून त्याचे अभिनंदन केले आहे. 


नीरज चोप्राची आतापर्यंतची कामगिरी
ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट असणारा नीरज चोप्रा हा मूळचा पानिपत, हरियाणाचा आहे. अंजू बॉबी जॉर्ज नंतर जागतिक चॅम्पियनशिप स्तरावर अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय आहे. नीरजने 2017 च्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 85.23 मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले होते. 2016 च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने 82.23 मीटर भालाफेक करुन सुवर्णपदक जिंकले आणि भारतीय राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केली. नीरजने 2017 च्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 85.23 मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने 86.47 मीटर भाला फेकून स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले होते.


नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. ट्रॅक आणि फील्ड अॅथलेटिक्समध्ये भारताकडून पदक जिंकणारा तो पहिला खेळाडू आहे.


महत्वाच्या बातम्या :