Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघानं इतिहास रचला आहे. दिग्गज ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय संघानं पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव करत पहिल्यांदाच सेमीफायनल गाठली आहे. ग्रुप स्टेजमधून सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा विक्रम पहिल्यांदाच भारतीय महिला संघानं केला आहे. टीम इंडियानं या सामन्यात गुरजीत कौरच्या एकमेव गोलच्या बळावर हा ऐतिहासिक विजय मिळवला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये 22 व्या मिनिटाला गुरजीतनं एक गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत टिकवण्यात टीम इंडिया यशस्वी ठरली.
या सामन्यात भारताची गोलकिपर सवितानं जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं. सवितानं ऑस्ट्रेलियाचं मजबूत आक्रमण अनेकदा परतवून लावलं. विशेष म्हणजे पेनाल्टी क़ॉर्नरवर तिने केलेला बचाव हा वाखाणण्याजोगाच होता. तिच्या या कामगिरीमुळं सोशल मीडियावर तिचं चांगलंच कौतुक होत आहे.
पुरुष हॉकी संघ उपांत्य फेरीत
दुसरीकडे टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला आहे. काल ग्रेट ब्रिटनला 3-1 हरवून टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली. भारतीय पुरुष हॉकी संघाने चार दशकांनंतर ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली आहे. याआधी 1972 मध्ये पुरुष हॉकी संघाने ही कामगिरी केली होती. रविवारी भारतीय संघाने ग्रेट ब्रिटनचा 3-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे. भारतासाठी दिलप्रीत सिंगने सातव्या मिनिटाला, गुरजंत सिंगने 16 व्या आणि हार्दिक सिंहने 57 व्या मिनिटाला गोल केले. सॅम्युएल वार्डने 45 व्या मिनिटाला ब्रिटनसाठी एकमेव गोल केला. उपांत्य फेरीत भारताचा सामना विश्वविजेत्या बेल्जियमशी होईल. बेल्जियमने तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्पेनचा 3-1 असा पराभव केला.
धावपटू दुती चंदचं ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात
टोकियो ऑलिम्पिकमध्ये आजच्या दिवसाची भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय धावपटू दुती चंदचं ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. दुती 200 मीटर हीट 4 प्रकारात सातव्या क्रमांकावर राहिली. यामुळं दुतीच्या सेमिफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. तिनं हीट 4मध्ये 23.85 सेकंद एवढा वेळ घेतला. दुतीचा या प्रकारात व्यक्तिगत बेस्ट 23.00 सेकंदांचा आहे. दुतीने 23.85 च्या हंगामातील सर्वोत्तम वेळेसह 200 मीटर अंतर पार केले खरे पण ती सातव्या स्थानावर राहिली. यामुळं ती उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्यात अयशस्वी झाली. क्रिस्टीन एमबोमाने 22.11 वेळेसह हीट 4मध्ये अव्वल स्थान मिळवले तर अमेरिकेची गॅब्रिएल थॉमस 22.20 च्या वेळेसह दुसऱ्या स्थानावर राहिली. दुती चंद महिलांच्या 100 मीटर स्पर्धेच्या उपांत्य फेरी गाठण्यातही अपयशी ठरली होती. हिट 5 मध्ये दुतीनं 11.54 सेकंदांचा वेळ घेतला होता. ती या प्रकारात 7 व्या स्थानावर होती.
कमलप्रीत कौरकडे भारतीयांचं लक्ष
काल पीव्ही सिंधूनं बॅडमिंटनमध्ये कांस्य पदकावर नाव कोरत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. सिंधूपाठोपाठ भारताच्या पुरुष हॉकी संघानंही उपांत्य फेरीत धडक दिली आहे. याशिवाय कमलप्रीत कौर महिला थाळी फेकच्या अंतिम फेरीत खेळणार आहे. कमलप्रीत कौरकडे भारतीयांचं लक्ष लागलं असून तिला पदकाची प्रबळ दावेदार मानलं जात आहे.
आजचं वेळापत्रक
थाळी फेक फायनल
सायंकाळी 4:30 वाजता : कमलप्रीत कौर, महिलांची थाळी फेक फायनल
घोडेस्वारी
दुपारी 1:30 वाजता : फवाद मिर्झा, इव्हेंटिंग जंपिंग वैयक्तिक पात्रता
सायंकाळी 5:15 वाजता : वैयक्तिक जम्पिंग फायनल
नेमबाजी
सकाळी 8 वाजता : संजीव राजपूत आणि ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, पुरुषांची 50 मीटर रायफल थ्री पोझिशन क्वालिफिकेशन
दुपारी 1:20 वाजत : पुरुषांची 50 मीटर रायफल थ्री पोझिशन फायनल