IND vs GER, Hockey Match : भारतीय हॉकी संघानं इतिहास रचत आक्रमक जर्मनीवर मात करत कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केला आहे. तब्बल 41 वर्षांनी भारतीय पुरुष संघानं धमाकेदार खेळी करत ऑलिम्पिक पदक पटकावलं आहे. अटी-तटीच्या सामन्यात भारतानं जर्मनीचा 5-4 अशा फरकानं पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच जर्मनी आक्रमक खेळी करत होती. सामना सुरु झाल्यावर अवघ्या काही मिनिटांतच पहिला गोल डागत जर्मनीनं आघाडी घेतली होती. पण, भारतानं आपल्या संयमी खेळीच्या जोरावर जर्मनीचं आव्हान संपुष्टात आणलं. भारताचा गोलकिपर श्रीजेशनं उत्तम खेळी करत जर्मनीचे अनेक गोल परतवून लावले. श्रीजेशच्या अभेद्य भिंतीमुळेच भारताचा विजय सोपा झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
भारतासाठी सिमरनजीत सिंहने दोन, हरमनप्रीत सिंह, रुपिंदर पाल सिंह आणि हार्दिक सिंहनं प्रत्येक एक-एक गोल डागत सामन्यात जर्मनीवर मात करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली. भारताची सुरुवात काहीशी निराशाजनक होती. जर्मनीनं सामन्याच्या पहिल्या मिनिटालाच गोल डागल 1-0 नं आघाडी घेतली होती. जर्मनीच्या वतीनं तिमुर ओरुजनं गोल केला होता. भारताला पाचव्या मिनिटाला वापसी करण्याची संधी मिळाली. पण पेनल्टी कॉर्नवर गोल करण्यात रुपिंदर पाल सिंह अयशस्वी ठरला.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये टीम इंडियाची वापसी
भारतानं दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला धमाकेदार खेळी करत 17व्या मिनिटाला गोल डागला. सिमरनजीत सिंहनं हा गोल डागला आणि सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर जर्मनी आणखी आक्रमक होताना दिसली. लगेचच भारताना आणखी एक गोल डागत सामन्यात आघाडी घेतली. हार्दिक सिंहनं या सामन्यात भारताला वापसी मिळवून दिली आणि पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामन्यात 2-3 अशी आघाडी घेतली. त्यानंतर भारतानं 28व्या मिनिटाला आणखी एक गोल डागत सामन्यात बरोबरी साधली.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतानं या सामन्यात पूर्णपणे जर्मनीवर दबाव बनवला होता. भारतानं या क्वार्टरमध्ये दोन गोल डागले. चौथा गोल 31व्या मिनिटाला रुपिंदर पाल सिंहनं आणि 34व्या मिनिटाला सिमरनजीत सिंहनं पाचवा गोल डागला. भारताना 5-3 अशी आघाडी घेतली. चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला जर्मनी काहीशी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. जर्मनीनं चौथा गोल डागत सामना 5-4 अशा उत्कंठावर्धक वळणावर आणला. पण वेळ संपली आणि जर्मनीचं कांस्य पदका मिळवण्याचं स्वप्न अधुरं राहिलं.
यापूर्वी भारताच्या वासुदेवन भास्करनच्या नेतृत्त्वात 1980 मध्ये मॉक्सो ऑलिम्पिकमध्ये भारतानं सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. आजच्या पदाकासोबतच ऑलिम्पिकमध्ये हॉकीत भारताच्या पदकांची संख्या 12 झाली आहे. यापैकी 8 सुवर्णपदकं, एक रौप्यपदक आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे. असा विक्रम करणारा भारतीय हॉकी संघ जगभरातील एकमेव संघ आहे.
हॉकीमध्ये भारताना आपलं शेवटचं पदक 1980 मध्ये मॉक्सो ऑलिम्पिकमध्ये जिंकलं होतं. त्यावेळी वासुदेवन भास्करन कर्णधार होते. त्यांच्या नेतृत्त्वात भारतानं सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. त्यानंतर आतापर्यंत भारताचं सर्वात चांगलं प्रदर्शन 1984 च्या लॉस अॅजलोसमध्ये होतं. या ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ पाचव्या स्थानावर होता. आजच्या विजयानंतर तब्बल 41 वर्षांनी भारतानं ऑलिम्पिक हॉकीमधील पदकांचा दुष्काळ संपवत कांस्य पदकावर नाव कोरलं आहे.