IND vs ARG, Women's Hockey Match : भारतीय महिला हॉकी संघाला उपांत्य फेरीत अर्जेंटिनाकडून 2-1 ने पराभूत व्हावे लागले. या सामन्यात संघाने चांगली कामगिरी केली, पण विजय मिळवू शकला नाही. या ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास रचला होता. भारत आता ब्रॅांझ पदकासाठी खेळणार आहे.






गुरजीत कौरने दुसऱ्या मिनिटाला भारताला आघाडी मिळवून दिली. पण अर्जेंटिना दुसऱ्या क्वार्टरमध्ये पुनरागमन केलं आणि कर्णधार मारिया नोएल बॅरिओन्यूवोने गोल करून स्कोर 1-1 असा बरोबर केला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्कोअर बरोबरीत राहिल्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये मारियाने पुन्हा गोल करत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाने चौथ्या क्वार्टरमध्ये आघाडी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला, तर भारतीय संघाने पुढे जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. निर्धारित वेळेपर्यंत भारतीय संघ दुसरा गोल करू शकला नाही आणि त्याचे अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न भंगले.


पंतप्रधान मोदींकडून ट्वीट करत संघाचं कौतुक
सामन्यानंतर ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाच्या संघर्षाचे कौतुक केले. "टोकियो ऑलिम्पिकमध्ये एक गोष्ट आमच्या लक्षात राहील, ती म्हणजे आमच्या हॉकी संघांची उत्तम कामगिरी. आज आमच्या महिला हॉकी संघाने संयमाने खेळ केला आणि उत्तम कौशल्य दाखवले. संघाचा अभिमान आहे. पुढील खेळासाठी आणि भविष्यासाठी शुभेच्छा."


कांस्यपदकासाठी ग्रेट ब्रिटनशी सामना खेळला जाणार
भारतीय महिला संघ कदाचित अंतिम फेरीत पोहचला नसेल, पण त्यांना अजूनही कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे. कांस्यपदकासाठी त्यांचा सामना ग्रेट ब्रिटनशी होईल, ज्यांना नेदरलँड्सकडून दुसऱ्या उपांत्य सामन्यात 1-5 ने पराभूत व्हावे लागले आहे. याशिवाय सुवर्णपदकाच्या लढतीत अर्जेंटिनाचा सामना नेदरलँडशी होणार आहे. कांस्यपदक जिंकून भारतीय संघ ऑलिम्पिक प्रवास पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे.