नवी दिल्ली : हॉकी इंडियाने भारतीय संघाचा अनुभवी गोलकीपर पीआर श्रीजेश आणि महिला टीमची खेळाडू दीपिका यांची नावं प्रतिष्ठित राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी पाठवली आहे. तर अर्जुन पुरस्कारासाठी ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगचं नाव पाठवलं आहेत.

टोक्यो ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाचे सदस्य हरमनप्रीत, वंदना कटारिया आणि नवजोत कौर यांची नावे अर्जुन पुरस्कारासाठी पाठविली गेली आहेत. द्रोणाचार्य पुरस्कारासाठी प्रशिक्षक बी.जे. करीअप्पा आणि सीआर कुमार यांची नावे देण्यात आली आहेत.

हॉकी इंडियाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आजीवन योगदानाबद्दल ध्यानचंद पुरस्कारासाठी माजी खेळाडू आरपी सिंग आणि एमसी संग्गाइ इबेमाल यांच्या नावांची शिफारस केली गेली आहे.

खेलरत्न पुरस्कारासाठी 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत परफॉर्मन्स स्केल ठेवण्यात आला आहे. या दरम्यान, श्रीजेशने ब्रेडा येथे चॅम्पियन्स ट्रॉफी 2018 मध्ये रौप्य पदक, 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक आणि एफआयएच मालिका अंतिम भुवनेश्वर 2019 मध्ये सुवर्णपदकात श्रीजेशने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

2015 मध्ये श्रीजेशला अर्जुन आणि 2017 मध्ये पद्मश्री मिळाला आहे. त्याचवेळी, दीपिका 2018 एशियन गेम्स आणि 2018 ची आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या संघाची भाग होती. हरमनप्रीतने 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दुसरीकडे वंदना कटारियाने 200 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने आणि नवजोतने 150 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोबम यांनी या नामांकना विषयी सांगितले की, “गेल्या वर्षी राणीला खेळ रत्न मिळाला ही आमच्या सर्वांसाठी अभिमानाची बाब होती. यावेळी आम्ही दोन सर्वोत्कृष्ट हॉकी खेळाडूंची नावे पाठवत आहोत पीआर श्रीजेश आणि दीपिका. हॉकी इंडियाकडून या सर्वांच्या नावांची शिफारस करणे ही अभिमानाची बाब आहे. त्यांच्या योगदानाचा आणि कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे."